पुण्यातून गिरीष बापट लढवणार लोकसभा निवडणूक

girish-bapat
पुणे – शनिवारी मध्यरात्री भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सहा मतदार संघाचा या यादीत समावेश आहे. जळगाव, नांदेड, दिंडोरी, पुणे, बारामती, सोलापूर मतदार संघातील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. भाजपने यावेळी चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे.

पुण्यातून गिरीष बापट यांची भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत वर्णी लागली आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळेंचा या मतदारसंघात पत्ता कट करण्यात आला आहे. तर सोलापुरातही डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरीत विद्यमान खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांना डावलून शुक्रवारी भाजप प्रवेश केलेल्या भारती पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. जळगाव मतदार संघातही ए. टी. पाटील यांचे तिकीट कापण्यात आले आहे. या ठिकाणी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांना तिकीट देण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याची घोषणा रात्री दोन वाजता करण्यात आली, तर माढा मतदारसंघातून भाजप उमेदवार कोण हे अद्याप जाहीर झालेले नाही. माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवार घोषित केले असून त्यांचा प्रचार आज पासून सुरू होत आहे.

Leave a Comment