बारामतीमधून आमदार राहूल कुल यांच्या पत्नीला भाजपचे तिकीट

kanchan-kul
पुणे – अखेर भाजपला बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी उमेदवार सापडला असून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देऊन त्यांच्या सहयोगी पक्ष रासपचे नेते महादेव जानकर यांचे पंख छाटले असल्यामुळे महादेव जानकर आता भाजपच्या या खेळीवर काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महादेव जानकर यांनी गत निवडणुकीत बारामतीमधून निवडणूक लढवली होती.

एकेकाळी दौंडचे कुल घराणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दौंडमधून राहुल यांच्या मातोश्री रंजना कुल या आमदार राहिलेल्या आहेत. पण राष्ट्रवादीचे स्थानिक नेते रमेश थोरात आणि राहुल कुल यांच्यात नंतरच्या काळात संघर्ष सुरू झाला. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी त्यावेळी रमेश थोरात यांच्या बाजूने झुकत माप दिल्याने २०१४ च्या निवडणुकीत राहुल कुल यांनी महाआघाडीतील रासप पक्षात प्रवेश केला. ते त्यावेळी दौंडची उमेदवारी मिळवून आमदार म्हणून निवडून आले होते. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी कांचन यांना उभे करण्यात आल्यामुळे बारामती मतदार संघातील निवडणुकीला रंग चढणार आहे.

Leave a Comment