निवडणुकी दरम्यान मोदींचा बायोपिक रिलीज झाल्यास मनसेचे खळ्ळ-खट्याक

shalini-thakre
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम मोदी’ या चित्रपटावर आक्षेप घेतला असून हा चित्रपट ५ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सर्वांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन करावे, असे अपेक्षित असताना जर आचारसंहितेला सत्ताधारी पक्षच असे पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेला खळ्ळ-खट्याक करावे लागेल, असा इशाराच संघटनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

बहुप्रतिक्षित असा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक आगामी लोकसभा निवडणुकांच्या काळात रिलीज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. विवेक ओबेरॉयने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट निवडणुकीच्या काळात रिलीज करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस व डीएमकेने केली होती. आता या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे.

एक प्रसिद्धीपत्रक काढून या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या शालिनी ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. शालिनी ठाकरे म्हणतात, राज ठाकरे यांनी गेल्या वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यात मोदी-भाजपने सरकारी योजनांच्या प्रचारासाठी अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’ या दोन चित्रपटांना पक्षामार्फत निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला होता. एक वर्ष या घटनेला उलटत नाही तोच आणखी एक मोठा ‘पराक्रम’ भाजपवाल्यांनी करून दाखवला आहे. मोदी यांच्यावरील चित्रपटासाठी समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित लोक आपले योगदान देत आहेत, असा एक समज या चित्रपटाच्या ‘पडद्यामागील’ लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे. या गलिच्छ प्रचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment