
एखाद्या गावातील बहुतेक सर्व लोक एकाच मूत्रपिंडावर जगत आहेत असे सांगितले तर कुणी त्यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र आपल्या शेजारी नेपाळ देशात असलेल्या होक्से या छोट्या गावाची ओळख किडनी व्हिलेज अशीच आहे कारण येथील बहुतेक नागरिकांना एकच मूत्रपिंड आहे. म्हणजे त्यांच्यात हा दोष जन्मजात असेल असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण या गावातील बहुतेक लोकांनी त्यांची एका किडनी पैशासाठी विकलेली आहे. अति दारिद्र हे त्यामागचे महत्वाचे कारण असून याचा अचूक फायदा मानवी अवयव बाजार करणाऱ्या दलालांनी अचूक उठविला आहे.
नेपाळ मधील किडनी व्हिलेज अशी ओळख असलेले होक्से गाव

काठमांडू पासून १२ मैल पूर्वेकडे असलेले हे गाव अति गरीब आहे. रोजचे जगणे जगण्यासठी त्यांना पुरेसा पैसा मिळत नाही. त्यातून मानवी अवयव विक्रीच्या व्यवसायातील दलाल येथे येतात आणि या गरीब जनतेला पैशाचे लालूच दाखवून त्यांना किडनी विकण्यास भरीला घालतात. त्यासाठी अनेक थापा मारल्या जातात. किडनी काढली तरी पुन्हा ती शरीरात अपोआप वाढते, एकाच किडनीवर जगता येते असे या लोकांना पटविले जाते. किडनी दिली तर घर, जमीन घेण्यासाठी पैसे मिळतील अशी लालूच असते आणि त्याला हे गरीब बळी पडतात असेही समजते.

या भागातून आलेल्या लोकांना दक्षिण भारतात आणून त्यांची किडनी घेतली जाते आणि तीन दिवस रुग्णालयात ठेऊन घेऊन त्यांना कधी काही हजार तर कधी लाख दोन लाख रुपये दिले जातात. अर्थात हा सर्व व्यवहार अवैध मार्गाने होतो असेही समजते. आकडेवारीनुसार दरवर्षी किमान ७ हजार मूत्रपिंडे अश्या अविध मार्गांनी मिळविली जातात.
