आकाशातील ‘व्हर्लपूल’ने स्तिमित संयुक्त अरब अमिरातीतील अल ऐनचे नागरिक

whirpol
संयुक्त अरब अमिरातीतील अल ऐन शहराचे नागरिक रविवारी सकाळी आकाशामध्ये दिसणारे दृश्य पाहून स्तिमित झाले. या दृश्याचा व्हिडियो सोशल मिडियाद्वारे प्रसिद्ध केला गेला असून, यामध्ये आकाशामध्ये एक मोठे ‘व्हर्लपूल’, म्हणजेच भोवरा पहावयास मिळत आहे. ‘डेली मेल’ ने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडियो इब्राहीम अल जर्वान नामक एका हवामान तज्ञाने ‘आकाशामध्ये दिसून आलेले सुंदर आणि दुर्मिळ दृश्य’ असे कॅप्शन देऊन ट्वीटरवर प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडियो आणि प्रत्यक्षात आकाशामध्ये हे व्हर्लपूल पाहणाऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया सोशल मिडीयावर दिल्या आहेत. कोणाच्या मते पाण्यामध्ये ज्या प्रकारे कधी तरी मोठा भोवरा तयार होतो, तसाच काहीसा हा प्रकार आहे, तर काहींनी, दुसऱ्या विश्वात जाण्याचे हे प्रवेशद्वार असल्याचे म्हटले आहे. काहींनी ही कमाल युएफओची असून, काहींनी आकाशाला छेद पडले असल्याच्याही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


मात्र या व्हर्लपूलचा व्हिडियो प्रसिद्ध केला गेल्यानंतर हवामान खात्याच्या वतीने यावर त्वरीत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आकाशामध्ये दिसून येणाऱ्या अशा प्रकारच्या व्हर्लपूलला ‘फॉलस्ट्रीक होल’ असे म्हटले जाते. आकशातील ढगांमध्ये तापमान खूप नीचांकी असले, तरी ढगांमधील पाण्याचा अंश न गोठल्यामुळे असे दृश्य दिसत असल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. फॉलस्ट्रीक होल ही संकल्पना अतिशय दुर्मिळ असून याचा विस्तार पन्नास किलोमीटर पर्यंतही असू शकतो. त्यामुळेच अशा प्रकारचे फॉलस्ट्रीक होल आकाशामध्ये निर्माण झाल्यानंतर ते युएफओ असल्याचा गैरसमज अनेकांना होत असल्याचेही हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment