पार्थ पवारांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीसोबतच मनसेचे झेंडे!

Flag
पुणे : राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत राज ठाकरे यांच्या मनसेचाही झेंडा अजित पवार यांचे सुपुत्र मावळ मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचार सभेदरम्यान पाहायला मिळाला. तसेच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर मनसेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे तिथे असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीला अशा प्रकारे जाहीर पाठिंबा देण्याचे आदेश अद्याप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेले नाहीत.

भाजपविरोधी आपली भूमिका दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे. मनसेने ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पराभूत करण्यासाठी घेतल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. मावळ लोकसभा मतदार संघात आज राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांची प्रचार सभा वडगाव येथे होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे परिसरात एकत्र पाहायला मिळाल्यामुळे याची चर्चा सुरु आहे. पण हे आदेश यामुळे राज ठाकरेंनीच तर दिले नाहीत ना अशी चर्चा येथे होत आहे. पण मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी राष्ट्रवादीला अशा प्रकारे पाठिंब्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले नाहीत असे स्पष्ट केले आहे. तसेच पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment