नवरा बायकोच्या भांडणामुळे ग्रुप अॅडमिनला तुरुंगवास

whatsapp
इंदूर : व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे आजवर घडलेल्या चांगल्या आणि वाईट घटना आपण वाचल्या किंवा पाहिल्या असतील. त्याविरोधात पोलिसांकडून अफवा, खोट्या बातम्या, धर्म विरोधातील मेसेजमुळे अनेकांवर कारवाईही झाली आहे. पण व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला नवरा-बायकोच्या भांडणामुळे तुरुंगात जावे लागल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर येथे ही घटना घडली. पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह दोन जणांना अटक केली आहे.

मध्य प्रदेशातील ही पहिला घटना आहे, ज्यात आपल्या पत्नीची बदनामी करण्यासाठी पती व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करत होता. पती व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सदस्य असल्यामुळे ग्रुपमध्ये तो आपल्या पत्नीचे अश्लील फोटो आणि मेसेज टाकत होता. पण पत्नीला ही घटना समजताच तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. व्हॉट्सअॅप ग्रुपवर कुणीतरी अज्ञात व्यक्ती माझ्याबद्दल अश्लील मेसेज पाठवत आहे, अशी तक्रार तिने पोलीस स्टेशनला केली. पण पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने महिलेने थेट न्यायालयात धाव घेतली. इंदूरच्या अॅरोड्रोम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे.

महिलेच्या याचिकेवर पोलिसांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. चौकशीमध्ये असे समोर आले की, इंदूर सोशल मीडियाच्या नावाने जो ग्रुप सुरु होता. तो ग्रुप महिलेचा पती सनी गोलियाचा नातेवाईक दुर्गेश गोलियाने तयार केला होता. त्या ग्रुपमध्ये दुर्गेशने महिलेलाही अॅड केले होते. महिलेचा पती, सनी आणि तिचा दीर राजकुमार गोलियाही ग्रुपमध्ये होते. सनीला आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा होता म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

ट्रू कॉलरवर सनी गोलियाने आपल्या पत्नीचे अश्लील नाव लिहिले असल्यामुळे त्याच्या पत्नीला अनेक अश्लील फोन आणि मेसेज येत होते. पोलिसांच्या चौकशीमध्ये सनी आणि राजकुमार यांनी सांगितले की, सनी आणि पीडित महिलेच्या घटस्फोटाची केस न्यायालयात सुरु होती आणि तिला बदनाम करण्यासाठी इंदूर सोशल मीडिया नावाचा ग्रुप बनवून अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले जात होते.

Leave a Comment