… अखेर भाऊच धावला भावाच्या मदतीला

ambani
नवी दिल्ली – रिलायन्स कम्युनिकेशनने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत एरिक्सन कंपनीचे ५५० कोटी आणि त्यावरच्या व्याजाची रक्कम पूर्ण भरण्यात आली असल्याचे जाहीर केले. त्यानंतर रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी आवश्यक असलेल्या सर्व रकमेची पूर्तता माझा मोठा भाऊ मुकेश आणि त्याची पत्नी नीता यांनी केली असल्याची माहिती दिली. अनिल अंबानींना ही रक्कम न भरल्यास ३ महिन्यांच्या तुरुंगवासाला सामोरे जावे लागणार होते.

माझ्या कठीण काळात माझ्यासोबत माझा मोठा भाऊ मुकेश आणि त्याची पत्नी नीता उभे राहिले. त्यांचे मी मनापासून आणि आदरपूर्वक आभार मानत आहे. आमच्या कुटुंबाच्या खंबीर मूल्यांचे महत्त्व उदाहरणासह त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्याशी मी आणि माझे कुटुंबीय कृतज्ञ आहोत. भूतकाळ मागे टाकत आम्ही पुन्हा एकमेकांशी घट्ट जोडले गेलो असल्याचे म्हणत अनिल अंबानी यांनी मुकेश आणि नीता अंबानींचे आभार मानले.

न्यायालयाने एरिक्सन कंपनीचे देणे थकविल्याप्रकरणी दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अनिल अंबानी यांना १ कोटींचा दंड ठोठावला होता. तसेच, एक महिन्याच्या आत ही सर्व रक्कम चुकती करण्याचा आदेश दिला होता. तसेच, या आदेशाचे पालन न केल्यास अनिल अंबानींना ३ महिन्याचा तुरुंगवास सुनावण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिन्टन फाली नरिमन आणि न्यायमूर्ती विनित शरण यांच्या पीठाने हा निर्णय दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर रिलायन्स कम्युनिकेशनच्या प्रवक्त्याने आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून त्यांच्या आदेशानुसार इतर बाबींचीही पूर्तता करू, असे म्हटले होते.

Leave a Comment