लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाचे नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट

neerav-modi
नवी दिल्ली – लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या पळपुट्या नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. नीरव मोदीला आता कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

गेल्या १२ मार्च रोजी ईडीने सांगितले होते की नीरव मोदीच्या प्रत्यर्पणासंबंधी आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. अशातच वेस्टमिन्स्टर न्यायालयाने मोदीविरोधात वॉरंट जारी केले आहे. लंडन न्यायालयाने ही कारवाई ईडीच्या आरोपांनुसारच केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

लंडनमधील एका वृत्तपत्राने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ जारी केला होता. नीरव मोदी या व्हिडिओत लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत होता. मोदी लंडनमध्ये एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत असल्याचेही या व्हिडिओतून सांगण्यात आले होते. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये आम्ही नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाबाबत प्रयत्न करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले होते. आम्ही गेल्यावर्षीच नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाबाबत इंग्लंडकडे विनंती केली असल्याचेही कुमार यांनी सांगितले होते. आम्हाला नीरव मोदीच्या लंडनमधील वास्तव्याबाबत माहिती आहे. यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असेही कुमार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

Leave a Comment