संजीव कपूरच्या ‘एग्ज केजरीवाल’ या रेसिपीवर नेटकऱ्यांच्या धमाल प्रतिक्रिया

sanjeev-kapoor
सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी पाककलेला खऱ्या अर्थाने ग्लॅमरस बनविले. काही वर्षांपूर्वी टीव्हीवर येत असणाऱ्या त्यांच्या ‘खाना खजाना’ या शोने संजीव कपूर यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलेच, पण त्याशिवाय अनेक चविष्ट पदार्थ सर्वसामन्यांच्या घराघरात टीव्ही मालिकेच्या आणि त्यानंतर पुस्तकांच्या रूपामध्येही पोहोचविले. सोशल मिडीयाचा पसारा जसा वाढला, तशा संजीव कपूर यांच्या रेसिपीज युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवरही प्रसिद्ध होऊ लागल्या. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनविता येतील अशा रेसिपिज ही संजीव कपूर यांची खासियत समजली जात असल्याने त्यांच्या सर्वच रेसिपीज लोकप्रिय ठरत असतात.


अलीकडेच संजीव कपूर यांनी ट्वीटरवरून आणखी एक बनविण्यास सोपी आणि तितकीच चविष्ट पदार्थाची रेसिपी शेअर केली. रेसिपीचे नाव नेटीझन्सनी वाचले मात्र आणि रेसिपी कशी आहे या व्यतिरिक्त रेसिपीच्या नावावरही नेटकरी मंडळींनी धमाल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. संजीव कपूर यांनी अंडी वापरून तयार केलेल्या रेसीपीचे नाव आहे ‘एग्स केजरीवाल’..आता हे नाव वाचून नेटकरी मंडळीच्या प्रतिक्रिया कोणाला उद्देशून असतील याचा अंदाज नक्कीच लावता येऊ शकतो. वास्तविक कपूर यांच्या रेसीपीचे नाव १९६०च्या दशकातील सुप्रसिद्ध उद्योजक देवी प्रसाद केजरीवाल यांच्या नावावरून दिलेले आहे, पण नेटीझन्सनी मात्र याचा सबंध थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशी जोडला आहे.
sanjeev-kapoor1
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. ते सतत करीत असलेली उपोषणे, त्यांचा खोकला आणि थंडीची चाहूल लागते न लागते तोच गळ्याभोवती गुंडाळलेला मफलर यावरून सोशल मिडीयावरून भरपूर प्रतिक्रिया पहावयास मिळत असतात. त्यामुळे शेफ संजीव कपूर यांनी आपल्या नव्या रेसीपीचे नाव ‘एग्ज केजरीवाल’ ठेवताच सोशल मिडियावर नेटीझन्सने प्रतिक्रिया देण्याचा सपाटा सुरु केला. संजीव कपूर यांनी शेअर केलेली रेसिपी खरेतर खूप सोपी आहे. भाजलेल्या ब्रेडच्या स्लाईसवर चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि पाण्यामध्ये उकडलेले (पोच्ड) अंडे अशी ही साधी सोपी रेसिपी आहे. मात्र याला ‘एग्स केजरीवाल’ नाव दिल्याने नेटीझन्सनी मात्र ‘ही रेसिपी खाल्ल्यावर खोकला बरा होणार का?’ इथपासून ‘हा पदार्थ खाऊन मग उपोषणाला बसायचे का?’, ‘हा पदार्थ खाताना मफलर घालणे आवश्यक आहे का?’ अशा निरनिराळ्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर दिल्या आहेत.

Leave a Comment