
मागील दोन वर्षांपासून भारताची फुलराणी अर्थात सायना नेहवालचा बायोपिक चर्चेत आहे. पण सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान येत राहिल्या. अखेर हा चित्रपट सायनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोडला आहे. या बायोपिकमध्ये आता श्रद्धाऐवजी दुसरा चेहरा झळकणार आहे.
सायनाच्या बायोपिकमधून श्रद्धाची एक्झिट
श्रद्धाने बॅडमिंटनच्या काही महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर शूटिंगला सुरुवात केली होती. पण तिला शूटिंग सुरू होताच काही दिवसांनी डेंग्यू झाला. तिने त्यानंतर तिच्या दुसऱ्या चित्रपटांसाठी काही वेळ दिला. पुन्हा सायनाच्या बायोपिकचे शूटिंग एप्रिलमध्ये सुरू होणार होते. पण श्रद्धाची अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटातून गच्छंती झाली आहे. हा निर्णय श्रद्धाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे घेण्यात आल्याचे वृत्त आहे. सध्या श्रद्धा ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त असून त्याचबरोबर लवकरच प्रभाससोबतचा ‘साहो’ चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यासंदर्भात ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार माहितीनुसार, प्रत्येकाने शक्य ते सर्व प्रयत्न करूनसुद्धा तारखांची जुळवाजुळव होत नसल्यामुळे श्रद्धाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्यात आला. हा निर्णय एकमेकांच्या संमतीनेच घेण्यात आला असून चित्रपटाची स्क्रिप्ट अभिनेत्री परिणीती चोप्राला आवडली असल्यामुळे या बायोपिकमध्ये आता श्रद्धाच्या जागी परिणीती सायनाची भूमिका साकारणार असून लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.
