कथा एका चोराच्या दिलदारीची !

robber
नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करून सोडणारा एक किस्सा चीनमध्ये सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. झाले असे, की एका चोराने एका महिलेचे पैसे जबरदस्तीने तिच्याकडून काढून घेतले खरे, पण एटीएम मशीनच्या स्क्रीनवर दिसणारी महिलेच्या बचत खात्यातील शिल्लक पाहून महिलेकडून जबरदस्तीने काढून घेतलेले पैसे चोराने महिलेला परत देऊन टाकले. ही सर्व घटना एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, चीनी प्रसारमाध्यमांच्या वतीने हा व्हिडियो सोशल मिडीयावर शेअर करण्यात आला आहे.

या घटनेची सविस्तर हकीकत अशी, की चीनमधील हेयुआन शहरामधील आयसीबीसी बँकेच्या एटीएम मशीनमधून ली नामक महिला आपल्या बचत खात्यातून पैसे काढण्यास गेली असता, तिने काढलेले पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने एक मनुष्य हातामध्ये सुरा घेऊन तिच्या पाठोपाठ एटीएममध्ये शिरला. त्याच्या हातातील सुरा पाहून घाबरून गेलेल्या लीने, तिने एटीएम मधून नुकतेच काढलेले २५०० युआन त्या इसमाच्या हवाली केले. आश्चर्याची गोष्ट अशी, की चोराने ली ला तिच्या बचत खात्यामध्ये किती शिल्लक आहे हे पाहण्यासाठी तिचे एटीएम कार्ड पुन्हा स्वाईप करण्यास सांगितले. कदाचित बचत खात्यामध्ये अधिक पैसे असतील, तर ली कडून आणखी पैसे वसूल करण्याचा त्याचा मानस असावा.

चोराच्या आग्रहाखातर लीने आपले एटीएम कार्ड पुनश्च स्वाईप केले आणि बचत खात्यामधील शिल्लक दाखविली जाण्याबद्दल मशीनला सूचना दिली. मात्र लीच्या बचत खात्यातील शिल्लक स्क्रीनवर पाहताच, ली कडे अजिबातच पैसे नसल्याचे चोराच्या लक्षात आले. त्यानंतर जे घडले त्याने खुद्द ली देखील थक्क झाली, आणि या जगामध्ये माणुसकी अजून जिवंत असल्याचा पुरावाच जणू तिला मिळाला. लीच्या बचत खात्यातील शिल्लक पाहून तिच्याकडून जबरदस्तीने काढून घेतलेले पैसे चोराने तिला परत केले आणि तो तिथून निघून गेला. या चोराच्या दर्यादिलीचे कौतुक नेटकरी मंडळीनी केले असले, तरी एटीएम च्या सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेजवरून पोलिसांनी मात्र या इसमाला अटक केली असल्याचे समजते.

Leave a Comment