
नवी दिल्ली – सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या फेसबुक आणि त्यांच्याच इंस्टाग्राम युझर्ससाठी एक स्पेशल गिफ्ट दिले असल्यामुळे तुम्ही यापुढे लोकप्रिय गाणी आणि व्हिडीओ बिनधास्त शेअर करु शकणार आहात. कारण टी सिरीज, झी म्युझिकसह यशराज फिल्मबरोबर फेसबुकने करार केला आहे. त्यामुळे गाणे आणि व्हिडिओ शेअर केल्यास फेसबुककडून युझर्सवर होणारी कॉपीराईटची कारवाई टळणार आहे.
आता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बिनधास्त शेअर करा लोकप्रिय गाणी
हजारो गाणी आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्याची परवानगी भारतामधील लोकांना मिळणार असल्यामुळे त्यांना फेसबुकवर शेअर करणे अधिक अर्थपूर्ण आणि खास ठरणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुक आणि इन्सटाग्रामवर पोस्ट करण्यात येणाऱ्या गाण्यासह व्हिडिओवर यापूर्वी कॉपीराईट उल्लंघन केल्याच्या तक्रारी दाखल करण्यात येत होते. कारण संबंधित कंपन्यांकडे कॉपीराईटचे हक्क होते.
आम्ही भारतामधील संगीत उद्योगाबरोबर भागीदारी करून उत्साही आहोत. भारतीयांना आपले मित्र आणि कुटुंबासह व्यक्त होण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार असल्याचे फेसबुक इंडियाचे संचालक मनीष चोप्रा यांनी सांगितले. गल्ली बॉयमधील ‘अपना टाईम आयेगा’, सिंबामधील आंख मारे, सैराटमधील ‘झिंगाट’ गीत आदी लोकप्रिय गाण्यांचा यामध्ये समावेश आहे. जगभरातल्या कानाकोपऱ्यात बॉलीवूडमधील गाणी ऐकली जावीत, हा कॉपीराईट घेण्यामागे हेतू आहे. फेसबुक वापरकर्ते त्यांच्या भावना मीम्स, पोस्ट, मेसेज हे मसाला-तडका टाकून तयार करता येणार असल्याचे टी-सीरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांनी सांगितले.
