न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंधाधुंद गोळीबारात 40 ठार

new-zeland
ख्राईस्टचर्च – न्यूझीलंडमधील मशिदीत जेव्हा संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर गर्दी होती तेव्हा करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबारात 40 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी दिली आहे. हा गोळीबार ख्राईस्टचर्च येथील मशिदीत करण्यात झाला. हल्लेखोराने घटनेनंतर घटनास्थळावरुन पळ काढला होता. यासोबतच या घटनेचे हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले होते.

पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून यात तीन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. त्याचदरम्यान ख्राईस्टचर्चमधील वेगवेगळया परिसरातील कारमध्ये स्फोटके सापडली असून ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस प्रमुख माईक बुश यांनी दिली.

ख्राईस्टचर्च येथे गंभीर परिस्थिती निर्माण झाले असल्याचे आपल्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात मुस्लिम मशिद अल नूर येथे जमलेले होते. बांगलादेश क्रिकेट संघदेखील यामध्ये होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू सुरक्षित आहेत.

याप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने stuff.co.nz ला दिलेल्या माहितीनुसार आपण प्रार्थना करत असताना गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिले असता आपली पत्नी रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेली होती. आपल्या मुलांवर गोळीबार होताना पाहिल्याचे दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले. माझ्या आजुबाजूला सगळीकडे मृतदेह होते असेही त्यांनी सांगितले.

लष्करातील जवानांसारखे कपडे हल्लेखोराने परिधान केले असल्याची माहिती आहे. पण या माहितीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान गोळीबारानंतर परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान बांगलादेशचा संपूर्ण संघ सुरक्षित असून ते मानसिक धक्क्यात असल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट संघाच्या प्रवक्त्याने दिली आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Comment