अतुल कुलकर्णी लिहिणार आमिरच्या आगामी चित्रपटाची कथा

atul-kulkarni
मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी याने मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत देखील आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. हे आपल्याला काही नव्याने सांगायची गरज नाही. त्यातच बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानशी असलेली अतुलची दोस्ती आपल्याला काही नवीन नाही. अतुल कुलकर्णीने आमिरसोबत राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात काम केले होते. त्याचबरोबर आमिरने अतुलच्या ‘नटरंग’मधील भूमिकेचेही भरभरून कौतुक केले होते.

त्याचदरम्यान आमिरने एका मुलाखतीत अतुलसोबत पुन्हा काम करायला आवडेल अशी इच्छाही व्यक्त केली होती. आता त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण अतुल कुलकर्णी आमिरच्या आगामी चित्रपटासाठी कथा लिहिणार आहे. ५४ व्या वाढदिवसानिमित्त आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा आमिरने केली आहे. १९९४ सालचा ऑस्कर विजेता चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा हा चित्रपट रिमेक असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वेत चंदन सांभाळणार असून चित्रपटाची कथा अतुल कुलकर्णी लिहिणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लाल सिंग चड्डा’ असे असणार आहे.


अतुल कुलकर्णी ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपटासाठी लेखन करणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श याने ट्विट करत दिली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सप्टेंबर २०१९ मध्ये सुरूवात होणार आहे तर हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment