दिल्ली कॅपिटल्सला मिळाला ‘गाईड’ दादा

saurav-ganguly
नवी दिल्ली – आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली डेअर डेव्हिल्स हा संघ नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स म्हणून नव्याने मैदानात उतरणार आहे. आता या संघाला ‘गाईड’ दादा मिळाला असून टीम इंडियाचा माजी कर्णधार या संघाला मार्गदर्शन करणार आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीची दिल्लीच्या संघव्यवस्थापनाने दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मार्गदर्शक पदासाठी नियुक्ती केली आहे. सौरव गांगुली आगामी हंगामासाठी प्रशिक्षक रिकी पाँटींगसोबत काम करणार आहे.


यावर प्रतिक्रिया देताना सौरव गांगुली म्हणाला की, मी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत काम करण्यासाठी उत्सुक असून संघातील सर्व खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांसोबत काम करायला मला आवडेल. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचे चेअरमन पार्थ जिंदाल यांनी सौरवच्या आगमनाबद्दल प्रतिक्रीया व्यक्त करताना भारतीय क्रिकेटचा एक यशस्वी कर्णधार म्हणून सौरव हा ओळखला जातो. आमच्या संघाला त्याच्या अनुभवाचा फायदा नक्की होईल, याची आम्हाला खात्री असल्यामुळे आमच्या संघासोबत सौरव काम करणार ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. आयपीएलच्या आगामी हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Leave a Comment