राणी एलिझाबेथ आणि इतर शाही परिवारजनांचे अनेक परदेशी भाषांवर प्रभुत्व

elizabeth
ब्रिटनच्या शाही परिवारातील सदस्य हे जगातील काही अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहेत. ब्रिटनची राणी एलिझाबेथ जगातील सर्वाधिक काळासाठी सत्तेवर असलेली शासनकर्ती आहे. या नात्याने जगभरातील अनेक देशांचे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, वैज्ञानिक राणीची भेट घेण्यासाठी येत असतात, तसेच राणी एलीझाबेथ आणि शाही परिवाराचे इतर सदस्य देखील अनेक औपचारिक समारंभांच्या निमित्ताने इतर देशांना भेटी देत असतात. याच कारणास्तव अनेक परदेशी भाषा शाही परिवारांना अवगत असून, या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. किंबहुना शाही परिवारातील सर्व सदस्यांच्या शिक्षणामध्ये लहानपानापासूनच परदेशी भाषांचाही समावेश केला जाण्याची परंपरा पूर्वीपासूनच चालत आली आहे.

राणी एलिझाबेथ आणि इतर शाही परिवारजनांना अनेक भाषा उत्तम अवगत आहेत. यामध्ये अर्थातच इंग्रजीचा समावेश आहे, कारण ही त्यांची मातृभाषा आहे. या शिवाय फ्रेंच भाषेवरही राणी एलिझाबेथचे प्रभुत्व आहे. एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचे जर्मन भाषेवर प्रभुत्व असून, त्यांनी त्याच्या आयुष्यातील काही काळ जर्मनीमध्ये व्यतीत केल्याने त्यांना ही भाषा उत्तम अवगत आहे. त्याशिवाय प्रिंस फिलीप यांना फ्रेंचही उत्तम बोलता येते. प्रिन्स चार्ल्स, आणि प्रिन्स विलियम यांना देखील जर्मनचे उत्तम ज्ञान आहे. या शिवाय प्रिन्स चार्ल्स आणि विलियम यांना वेल्श भाषाही अवगत आहे.

प्रिन्स चार्ल्स आणि विलियम यांना जर्मन, फ्रेंच, वेल्श यांच्या व्यतिरिक्त गेलिक भाषेचे ही माफक ज्ञान असून, विलियमला स्वाहिली आणि थोड्याफार प्रमाणात रशियन भाषाही अवगत आहे. प्रिन्स हॅरीची पत्नी मेघन मार्कलला इंग्रजी शिवाय फिलिपिन्स येथील स्थानिक भाषा ‘टॅगालॉग’चे माफक ज्ञान आहे. विलियमची मुले प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शार्लोट यांना इंग्रजी भाषा अर्थातच अवगत आहेच, पण त्याशिवाय इतक्या लहान वयातच दोघांना जर्मन आणि स्पॅनिश भाषांचे शिक्षणही दिले जात आहे.