अचानक गायब झाल्या या व्यक्ती, आजतागायत कोणताच मागमूस नाही

mysterious
आजवरच्या जगभरातील इतिहासामध्ये काही व्यक्ती ज्या प्रकारे हवेत विरल्याप्रमाणे गायब झाल्या त्या घटनांनी या व्यक्तींचे नातेवाईक, सहकारी, आप्तेष्ट आणि अर्थातच पोलिसांना ही बुचकळ्यात टाकले आहे. या व्यक्ती अचानक गायब झाल्या, त्या परत कधीही न येण्यासाठीच. या व्यक्ती नेमक्या कुठे गेल्या, कशासाठी केल्या, पुढे त्यांचे काय झाले, हे आजतागायत न उलगडलेले कोडे होऊन बसले आहे. १९३०-४० च्या दशकामध्ये संगीतकार म्हणून मोठी लोकप्रियता मिळवीत असणारे ग्लेन मिलर हे एका मोठ्या रॉक बँडचे लीड सिंगर होते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी युरोपमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याचे मनोरंजन करण्यासाठी जात असताना मिलर प्रवास करीत असलेले विमान इंग्लिश चॅनेलवरून गायब झाले. कैक दिवस प्रयत्न करूनही या विमानाचा आणि पर्यायाने मिलर यांचा शोध लागू शकला नाही. अखेरीस हे विमान समुद्रामध्ये कोसळले असावे असा निष्कर्ष काढण्यात येऊन शोधकार्य बंद करण्यात आले. अगदी अलीकडच्या काळामध्ये आणखी एक संगीत कलाकार, फॉरेस्ट श्वाबही रहस्यमय रित्या गायब झाला. २०१० साली हा लोकप्रिय रॅपर मेक्सिकोला जात असताना अचानक गायब झाला. मात्र श्वाबला अंमली पदाथांचे व्यसन असल्याने त्या नशेमध्ये त्याला अपघात झाला असावा असा पोलिसांचा संशय असला, तरी आजतागायत श्वाबबद्दल कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.
mysterious1
१९५३ साली अमेरिकन वायुसेनेमध्ये फायटर पायलट असलेला फेलिक्स मोन्कला मिशिगन येथील किनरॉस एअरबेसवर तैनात होता. एके दिवशी एक अज्ञात विमान दिसल्याने हे विमान कुठले हे पाहण्यासाठी आपले विमान घेऊन फेलिक्सने उड्डाण केले खरे, पण त्यानंतर अचानक आढळलेले अज्ञात विमान आणि फेलिक्सचे विमान ही दोन्ही विमाने कुठे गायब झाली याचा थांगपत्ता कोणालाच लागला नाही. काहींच्या म्हणण्यानुसार हे अज्ञात विमान दुसरे तिसरे काही नसून, परग्रहावरून आलेले एक युएफओ होते, व त्यानेच फेलिक्सला पळवून नेल्याच्या कथा येथे आजही चर्चिल्या जातात. फेलिक्स प्रमाणे लायोनेल क्राब हा देखील कसा गायब झाला याचे कोडे देखील आजतागायत उलगडलेले नाही. लायोनेल ब्रिटीश नौसेनेमध्ये असून, एका रशियन सबमरीनवर खास प्रशिक्षणासाठी त्याला पाठविण्यात आले होते. प्रशिक्षणाचा भाग असलेल्या एका मिशनच्या अंतर्गत लायोनेल सबमरीनवरून समुद्रामध्ये उतरला, आणि परतलाच नाही.
mysterious2
हाईनरिश म्युलर हा हिटलरच्या नाझी गेस्टापोचा प्रमुख होता. लाखो ज्यू लोकांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या म्युलरला हिटलरच्या मृत्युच्या वेळी बंकरमध्ये पाहिले गेले होते. हिटलरने आत्महत्या केल्यानंतर हिटलर आणि त्याची पत्नी एव्हा यांची शवे सापडली, मात्र म्युलर त्या वेळेपासून जो गायब झाला, तो आजतागायत कुठे गेला असावा याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अनेकांच्या मतानुसार म्युलर मरण पावला असला, तरी त्याच्या मृत्यूला दुजोरा देणारा कोणताही अधिकृत पुरावा अद्याप सापडलेला नाही. १८७२ साली न्यूयॉर्क हून जेनोआकडे निघालेली ‘मेरी सेलेस्ते’ ही बोट अचानक गायब झाली खरी, मात्र काही काळाने ही बोट पोर्तुगलच्या किनाऱ्याजवळ तरंगताना आढळली. या बोटीला कोणत्याही प्रकारचे निक्सान झालेले आढळले नाही, मात्र या बोटीवर असणारे सर्व प्रवासी गायब झाले असून, त्यांचा मात्र कोणताच मागमूस लागू शकला नाही.

Leave a Comment