
बी-टाऊनमध्ये बायोपिक आणि सिक्वल चित्रपटांना खुपच उधाण आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण यात काही चित्रपट सुपरहिट होत आहेत तर काही चित्रपट फ्लॉप होत आहेत. आता यात आणखी एका गाजलेल्या चित्रपटाची भर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये 2002मध्ये झालेल्या आंखे या थ्रीलर चित्रपटाच्या सिक्वलची जोरदार चर्चा सुरु होती. पण आता मिळालेल्या माहितीनुसार आंखेच्या सिक्वलसाठी कास्टिंगचे काम सुरु झाले आहे. अमिताभ बच्चन यांचे नाव या सिक्वलसाठी फायनल मानले जात आहे. त्याचबरोबर मुख्य भूमिकेसाठी जॅकलिन फर्नांडिस हिच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे.
‘आंखे’च्या सिक्वलमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार जॅकलिन फर्नांडिस
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या या सिक्वलमध्ये पाच मुख्य पात्र असणार आहेत. अमिताभ बच्चन यात मुख्य भूमिकेत दिसतील. त्याचबरोबर परेश रावल यांचीही भूमिका असेल. अन्य भूमिकांसाठी ए-लिस्ट स्टारशी संपर्क केला जात आहे. तर मुख्य भूमिकेसाठी जॅकलिनच्या नावाला निर्मात्यांनी पसंती दिली आहे. या सिक्वलचे दिग्दर्शन अनीस बज्मी करणार आहेत.
तूर्तास जॅकलिनकडे फार काम नाही. सलमान खानच्या ‘रेस 3’मध्ये यापूर्वी ती अखेरची दिसली होती. यानंतर तिने धर्मा प्रॉडक्शनचा ‘ड्राईव्ह’ हा चित्रपट साईन केला. ती सुशांत सिंग राजपूतसोबत या चित्रपटात झळकणार होती. पण हा चित्रपट मध्येच लटकल्यामुळे ‘आंखे 2’ची ऑफर आली असेल तर जॅक ती नाकारणार नाही.
