झिनेदिन झिदान पुन्हा एकदा रिअल माद्रिदचा प्रशिक्षक

Zinedine-Zidane
माद्रिद – तब्बल १० महिन्यानंतर पुन्हा एकदा रिअल माद्रिदचे माजी प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रिअल माद्रिदच्या व्यवस्थापनाने सॅन्टियागो सोलारी यांच्या प्रशिक्षणाखाली संघाच्या खालावलेल्या कामगिरीमुळे झिनेदिन झिदान यांची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

झिनेदिन झिदानने रिअल माद्रिद संघाला विक्रमी सलग ३ वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर अचानक हंगामाच्या सुरुवातीला प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर स्पेनचे प्रशिक्षक ज्युलियन लोपेटगुई यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. रिअलची त्यांच्या कार्यकाळात इतिहासात सर्वात खराब कामगिरी झाली होती. लोपेटगुई यांना अवघ्या ४ महिन्यांच्या कार्यकाळातच रिअलने प्रशिक्षकपदावरुन हटवल्यानंतर त्यांच्या जागी सॅन्टियागो सोलारी यांना प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण संघाला त्यांच्या कार्यकाळातही अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले होते.

अडीच वर्षे झिनेदिन झिदान यांनी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळताना ९ स्पर्धांचे विजेतेपद मिळवून दिले होते. सलग ३ वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देणारे जगातील ते एकमेव प्रशिक्षक आहेत. रिअल माद्रिद त्यांच्या कार्यकाळात जगातील अव्वल संघ होता. रिअल माद्रिदला त्यांच्या राजीनाम्यानंतर यावर्षी एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. संघ कोपा डेल रे, चॅम्पियन्स लीग आणि ला लीगाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

Leave a Comment