
अहमदाबाद : केंद्रातील आणि गुजरातमधील भाजप सरकारला पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जामनगरमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार हार्दिक पटेल
आज अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक सुरु आहे. काँग्रेस या ठिकाणाहूनच आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. पूर्व उत्तर प्रदेशासाठी सरचिटणीस म्हणून निवड झालेल्या प्रियंका गांधी या बैठकीला उपस्थित आहेत. याशिवाय, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
दरम्यान, हार्दिक पटेल गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा हात धरुन हार्दिक पटेल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते.
