पळपुट्या नीरव मोदीचा लंडनच्या रस्त्यांवर मुक्त वावर

neerav-modi
लंडन – पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेला कर्जबुडव्या नीरव मोदी सध्या इग्लंडमध्ये वास्तव्यास असून लंडनच्या रस्त्यांवर मोदी सध्या मुक्त संचार करत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने दिले असून त्यांनी त्याचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. नीरव मोदी यात लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. कालच नीरव मोदीचा अलिबागमधील १०० कोटी रुपयांचा बंगला स्फोटके वापरुन पाडण्यात आला. पण आता तो लंडनधील ७० कोटींच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.


या व्हिडिओमध्ये टेलिग्राफच्या प्रतिनिधीने मोदीला अनेक प्रश्नही विचारलेले दिसत आहे. पण मोदी मौन बाळगत त्याच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर दिले नाही. नीरव मोदी पीएनबी या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात प्रमुख आरोपी आहे. मोदी गेल्यावर्षी भारतातून फरार झाला होता. इंटरपोलने गेल्यावर्षी जुलैमध्ये भारताच्या मागणीवरुन मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

Leave a Comment