माझ्या सत्ताकाळात जैशकडूनच भारतात हल्ले घडवले – मुशर्रफ

parvez-musharaff
इस्लामाबाद: आपल्या सत्ताकाळात पाकिस्तान सरकारच्या सांगण्यावरुन जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरने भारतात बॉम्बस्फोट केले असल्याची धक्कादायक कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे. त्यांनी ही खळबळजनक माहिती पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिकला टेलिफोन मुलाखतीत दिली. त्याचबरोबर जैश ए मोहम्मदवरील कारवाई योग्य असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. माझ्या हत्येचाही याच संघटनेने प्रयत्न केला असल्याचा दावा मुशर्रफ यांनी केला.

जैश ए मोहम्मद या संघटनेला मी नेहमीच दहशतवादी संघटनाच संबोधत आलो आहे. माझ्यावरही त्यांनी हल्ला केला होता. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मला आनंद आहे की सरकार या संघटनेविरोधात कडक कारवाई करत आहे. पण ही कारवाई आधीच व्हायला हवी होती, असे मुशर्रफ म्हणाले. पाकिस्तानमध्ये मुशर्रफ यांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदने डिसेंबर 2003 मध्ये हल्ला केला होता. त्यावेळी त्यांनी जैशवर दोनवेळा बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता.

याच दरम्यान त्यांना स्वत: बंदी का आणली नाही असा प्रश्न विचारण्यात आला. मुशर्रफ त्यावर म्हणाले, त्यावेळची परिस्थिती ठिक नव्हती. यामध्ये आमचे गुप्तचर आयएसआयवाले सहभागी होते, भारत-पाकिस्तानमध्ये त्यावेळी जशास तसे ही भूमिका घेतली जात होती. ते पाकिस्तानात स्फोट घडवत होते, आम्ही तिकडे करत होतो.

1999 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी सत्तापालट करुन पाकिस्तानची सूत्रे हाती घेतली होती. ते तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांना बेदखल करुन राष्ट्रपती झाले होते. त्यांनी 9 वर्षे सत्ता उपभोगली. त्यानंतर ते यूएईला रवाना झाले, सध्या ते तिथेच राहतात.

Leave a Comment