हरित लवादाने व्होक्सवॅगनला ठोठवला ५०० कोटींचा दंड

volkswagen
नवी दिल्ली: व्होक्सवॅगन या वाहननिर्मिती कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने आज ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. दोन महिन्यात ही रक्कम केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे जमा करण्याचे आदेश हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी दिले. वाहनांच्या डिझेल इंजिनमध्ये व्होक्सवॅगन कंपनीकडून फेरफार करण्यात आल्याचे सिद्ध झाले होते. वाहनांमधून कार्बनचे निर्धारित मर्यादेपेक्षा उत्सर्जन होत असल्याची बाब दडवून ठेवण्यासाठी इंजिन्स जाणीवपूर्वक प्रोग्राम करण्यात आल्यामुळे पर्यावरणाची मोठ्याप्रमाणावर हानी झाली.

राष्ट्रीय हरित लवादाने हा प्रकार समोर आल्यानंतर यावर चार तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमली होती. व्होक्सवॅगनने किमान १७१.३४ कोटींचा दंड भरावा, असे या समितीने सुचवले होते. अमेरिकेत व्होक्सवॅगन गाड्यांच्या इंजिनामधील घोटाळा २०१५ साली समोर आला होता. निर्धारित पातळीपेक्षा ४० पट अधिक या गाड्यांची इंजिन्स नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन करत असल्याची बाब सिद्ध झाली होती. भारतातील यंत्रणाही यानंतर खडबडून जाग्या झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २०१८ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने समिती नेमली होती.

या समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालानुसार २०१६ मध्ये व्होक्सवॅगनच्या वाहनांनी जवळपास ४८.६७८ टन नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन केले. अस्थमा आणि श्वसनाचे इतर विकार नायट्रस ऑक्साईडमुळे बळावण्याची शक्यता असते. नायट्रस ऑक्साईडमुळे याशिवाय धुके आणि अॅसिडचा पाऊस पडण्यासाठी हातभार लागू शकतो. हे परीक्षण दिल्लीत करण्यात आले होते. नायट्रस ऑक्साईडच्या या अतिरिक्त उत्सजर्नामुळे १७१.३४ कोटीचे नुकसान झाल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले होते.

Leave a Comment