भाजपचा फेसबुक जाहिरातींवर वारेमाप खर्च

BJP
नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीपूर्वी सोशल मिडीयातील जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला आहे. राजकीय पक्षांचा कल निवडणुका जवळ येत असल्याने सोशल मिडीयावर खर्च करण्याकडे वाढताना पाहायला मिळत आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या फेसबुकच्या अहवालानुसार फेसबुकवर भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय जाहिरातबाजीसाठी सर्वाधिक खर्च केला आहे. सोशल मिडीयावरील जाहिरातबाजीमध्ये प्रादेशिक पक्षही मागे नाही. खासदार, आमदार, संघटना, पक्षाचे नेते यांचा राजकीय जाहिरातींमध्ये समावेश आहे. राजकीय जाहिरातबाजीला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वेग आला आहे. आचारसंहिता ज्याक्षणी लागू होईल त्यानंतर सोशल मिडीयावरील जाहिरातबाजींवर निवडणूक आयोगाकडून चाप बसेल

फेब्रुवारी महिन्यात भाजपने फेसबुकवर 2 करोड 37 लाख एवढी रक्कम खर्च केली. तर काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी 10 लाख 60 हजार रूपये खर्च केले आहेत. फेसबुकवरील जाहिरातबाजीसाठी प्रादेशिक पक्षांनी 19 लाख 80 हजार खर्च केल्याची आकडेवारी यात समाविष्ट केली आहे. बिजू जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तेलगु देसम पार्टी, वाईएसआर काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा प्रादेशिक पक्षांच्या यादीत समावेश आहे. ही बातमी इकॉनॉमिक टाईम्स या इंग्रजी दैनिकाने फेसबुक डेटाच्या हवाल्याने दिली आहे.

Leave a Comment