
लखनौ – लोकसभा निवडणुकांसंदर्भातील प्रचारासंदर्भात काही नियम बहुजन समाजवादी पक्षाने आपल्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना आखून दिले आहेत. पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी होर्डिंग, बॅनर्स कशापद्धतीने छापले जावेत यासंदर्भातील नियमच जारी केले आहेत. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार पक्षाध्यक्षा मायावती यांच्या फोटोबरोबर पक्षाचा प्रचार करणाऱ्या होर्डिंगवर किंवा बॅनरवर कोणत्याही नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा फोटो छापल्यास पक्षामधून संबंधित व्यक्तीची हकालपट्टी केली जाईल.
होर्डिंग, बॅनर्स कशापद्धतीने छापले जावेत यासाठी बसपची नवी नियमावली
या नियमांची माहिती लखनौ येथील बैठकीमध्ये बसपचे आमदार आणि पक्षाने स्थापन केलेल्या मंडळ झोनचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी दिली. हार्डिंगस आणि बॅनरबद्दल पक्षाच्या जुन्या नेत्यांना पक्षाचे धोरण ठाऊक आहे. पण पक्षातील नवीन नेते आणि कार्यकर्ते अति उत्साहामध्ये निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पक्षाचे जाहिरात करतात. स्थानिक नेते आणि कार्यकर्ते अनेकदा होर्डिंगवर महापुरुषांच्या तसेच पक्षाध्यक्षा मायावती यांच्या फोटोपेक्षा स्वत:चा फोटो मोठ्या आकाराचा छापतात. यावरुन अनेकदा पक्षाची खिल्ली उडवली जात असल्यामुळे पक्षाने असले प्रकार थांबवण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेत नियमावलीच जारी केली आहे.
आमदार आंबेडकर यांनी लखनौ येथील बैठकीमध्ये बोलताना, पक्षाच्या मायावती या सर्वोच्च नेता असल्याचे उपस्थित नेत्यांना सांगितल्यामुळे त्यांच्या फोटोहून मोठ्या आकाराचा स्वत:चा फोटो छापणे चुकीचे दिसते. यापुढे कोणतेही होर्डिंग किंवा बॅनर छापण्याआधी ते मंडळ अध्यक्षांना दाखवून त्यांच्याकडून परवाणगी घेणे बंधनकारक असणार आहे अशी माहिती आंबेडकर यांनी या बैठकीत दिली.
