
नवी दिल्ली – भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला (आर इन्फ्रा) ६४८ कोटी रूपयांचे काम दिले आहे. हे नवीन विमानतळ राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे उभारले जाणार आहे. अहमदाबाद आणि राजकोटला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८ ब येथून जाणाऱ्या मार्गावर हे नवीन विमानतळ आहे. नवीन विमानतळ हे सध्या कार्यरत असलेल्या राजकोट विमानतळापासून ३६ किमी दूर आहे. आर इन्फ्राने हे काम लार्सन अँड ट्रूबो, दिलीप बिल्डकॉन तसेच गायत्री प्रोजेक्ट्स समवेत ९ कंपन्यांपेक्षा कमी रकमेची बोली लावून मिळवले.
कर्जबाजारी अनिल अंबानींना गुजरात विमानतळाचे कोट्यावधीचे कंत्राट
एक निवेदन प्रसिद्ध करुन आर इन्फ्राने म्हटले आहे की, गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ बनवण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. ई अँड सीला (इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन्स) मिळाले आहे. ६४८ कोटी रूपयांचे हे काम आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की, रनवे निर्मिती, टर्निंग पॅड, टॅक्सी लाइन, रस्ते, अग्निशामक स्थानक, कुलिंग पिट, एअरफिल्ड ग्राऊंड लायटिंग योजनेचे परीक्षणसह नेव्हिगेशन आणि पक्षांमुळे होणारी अडचण कमी करण्यासाठीचा उपाय आदी कामांचा या करारात समावेश आहे. रिलायन्स इन्फ्राचे ९ कंपन्यांमध्ये तांत्रिक गुण हे ९२.२ टक्के होता. काम करण्याची ऑर्डर मिळाल्यानंतर ३० महिन्याच्या आत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे.
