हवाई दलाने दिले एरियल स्ट्राईकचे सॅटेलाइट फोटोसह पुरावे

aerial-strike
नवी दिल्ली – पाकिस्तानातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी एरियल स्ट्राईक केला होता. आता या एरियल स्ट्राईकचे पुरावे हवाई दलाने केंद्र सरकारकडे सुपुर्द केले आहेत. जे बॉम्ब या मिशनसाठी वापरले त्यातील ८० टक्के बॉम्बनी अचूक लक्ष्यावर प्रहार केला, असे हवाई दलाने आपल्या अहवालात म्हटले असल्याचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

एरियल स्ट्राइकच्या यशस्वीतेबद्दल आजही परदेशी प्रसारमाध्यमांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडे हवाई दलाने सुपुर्द केलेले हे पुरावे महत्वपूर्ण आहेत. ठरवलेल्या लक्ष्यावर बॉम्ब पडले नाहीत हा दावा खोडून काढण्यासाठी हवाई दलाने एक फाईल तयार केली आहे. झाडे आणि जंगलाचा भाग वगळता फार काही नुकसान या बॉम्ब हल्ल्यामध्ये झाले नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. जर नुकसान झाले नाही मग पाकिस्तानी फायटर विमानांनी भारतीय हद्दीत घुसून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न का केला ? असा सवाल हवाई दल प्रमुखांनी विचारला होता.

उपग्रहाच्या मदतीने घेण्यात आलेले हाय रेसोल्युशन फोटो आणि एसएआर रडारच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंचा समावेश हवाई दलाने एअर स्ट्राइकसंबंधी तयार केलेल्या १२ पानी अहवालात आहे. ते फोटो मोदी सरकारकडे बालाकोटचा स्ट्राइक यशस्वी ठरला हे सिद्ध करण्यासाठी सुपूर्द केले असल्याचे हवाई दलातील सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले.

Leave a Comment