
पुणे – शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजकारण सध्या शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे जातीच्या वळणावर येऊन ठेपले असून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टीका करत त्यांची जात काढली. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांची जात मराठा नाही तर माळी असल्याचे सांगितले आहे. शिरुर मतदारसंघात त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ माजली.
अमोल कोल्हेंचे आढळराव पाटलांना जातीवरुन प्रतिउत्तर
आपल्या वक्तव्यावरुन सुरु झालेला वाद पाहून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सारवासारवही केली आहे. मी जातीचे राजकारण करत असल्याची उलट सुलट राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी चर्चा सुरु केली आहे. शिवसेनेत कधीही जातीचे राजकारण नसते, बाळासाहेबांची शिकवण मला आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणाच्याही जातीचा मी उल्लेख करत नाही. सगळ्या जाती माझ्यासाठी समान असून सगळ्यांबद्द्ल माझ्या मनात आदर आहे. जातीचे राजकारण मी कधीच केले नाही. माझ्याविरोधातील खोटा प्रचार राष्ट्रवादीने थांबवावा, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.
आढळरावांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनीही उत्तर दिले असून अमोल कोल्हे यांनी माझी जात विचारू नका मी छत्रपतींचा मावळा असल्याचे म्हटले आहे. माझी जात म्हणजे मी छत्रपतींचा मावळा हीच असल्याचेही अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. अमोल कोल्हे जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी स्वतःचा उल्लेख छत्रपतींचा मावळा असा केला आहे.
