
कुत्र्यांचे नाक अतिशय तीव्र असते हे आपण जाणतो. यामुळेच अनेक देशांच्या पोलीस दलात श्वान पथके सामील असतात. सध्या जर्मनी मधील कस्टम खात्यातील असेच एक जर्मन शेफर्ड जातीचे कुत्रे त्याच्या अनोख्या कौशल्याने चर्चेत आले आहे. विशेषतः चलनाची तस्करी करणाऱ्या तस्करांचा ते एक नंबरचा शत्रू बनले आहे. अवैध मार्गाने देशात आणल्या गेलेल्या कोट्यावधीच्या नोटा या बहाद्दराने नुसत्या वास घेऊन पकडून दिल्या आहेत. लुक नावाचा हा कुत्रा सध्या डूसेलडार्फच्या विमानतळावर तैनात आहे.
पैश्याचा वास अचूक ओळखणारा एजंट कुत्रा
गेले तीन महिने तो या कामावर आहे आणि कस्टम अधिकारी त्याच्या कामगिरीवर फिदा आहेत. देवल वासाने त्याने या काळात ७.४५,००० युरो म्हणजे ६ कोटी रुपये शोधून दिले आहेत. २०१८ मध्ये लुक २ वर्षाचा होता तेव्हा त्याला नोटा शोधण्याचे खास प्रशिक्षण दिले गेले असून विविध देशाच्या चलनी नोटांचा वास तो अचूक ओळखतो. अवैध मार्गाने असे चलन आणणाऱ्या १२ जणांना त्याने पकडून दिले आहे.
जर्मनी मधील कायद्यानुसार १० हजार युरो पेक्षा अधिक कॅश घेऊन देशात प्रवेश करता येत नाही. तसेच अशी कॅश देशाबाहेर न्यायाची असेल तरी त्याचे डिक्लरेशन करावे लागते. येथील कस्टम विभाग कॅश तस्करी रोखण्यासाठी सदैव तत्पर आहे. प्रत्येक देशाच्या चलनी नोटांचा वास त्यात वापरली जाणारी शाई आणि कागद यामुळे वेगळा असतो. एजंट लुक हे वास अचूक ओळखू शकतो कारण त्याला तसे प्रशिक्षण दिले गेले आहे. तो युरो, पौड आणि डॉलरचा वास ओळखताना अजिबात चूक करत नाही असे अधिकारी सांगतात.
