मसूद अझहरवर लवकरच कारवाईचा बडगा उगारणार पाक सरकार

masood-azhar
लाहोर – पाकिस्तान सरकार भारतासोबत निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या उद्देशाने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या क्रुरकर्मी मसूद अझहरवर लवकरच कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पाकिस्तान सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकार मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याविरोधात घेतलेला पवित्राही मागे घेण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ४ वेळा पाकिस्तानी नागरिक असलेल्या मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याविषयीचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करण्यात आला होता.

हा निर्णय इम्रान खान सरकारने घेतल्यास भारत-पाकदरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानला विंग कमांडर अभिनंदन यांना कोणत्याही अटींशिवाय भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेणे भाग पडले होते. याच दरम्यान पाक परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी मसूद सध्या मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असून तो पाकिस्तानात उपचार घेत असल्याचे सांगितले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास त्याला घरीच नजरकैदेत ठेवण्यात येईल की, तुरुंगात रवानगी करण्यात येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता देशाचे हित लक्षात घ्यायचे की, मसूदसारख्या दहशतवाद्याला पाठिशी घालायचे, हा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागेल, असे संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले आहे.

मागील आठवड्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नव्याने ठराव मांडला होता. पाकमध्ये असलेल्या जैशचा म्होरक्या मसूद याला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी यात करण्यात आली होती. त्याच्या जागतिक प्रवासाला बंदी घालावी, मालमत्ता जप्त करावी, हत्यारे बाळगण्यावर निर्बंध घालावेत अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली होती. सुरक्षा परिषद मंजूरी समिती १५ सदस्य देशांपैकी व्हिटोचा अधिकार आणि कायमचे सदस्यत्व असलेल्या या ३ देशांच्या मागणीवर १० दिवसांत यावर विचार करणार आहे. मागील १० वर्षांत अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याची मागणी करणारा प्रस्ताव चौथ्यांदा मांडण्यात आला आहे.

Leave a Comment