‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा

raj-thakre
मुंबई : पाकिस्तानात घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या एरियल स्ट्राईकनंतर त्यावरुन राजकारण देखील सुरु झाले आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिला आहे. येत्या शनिवारी राज ठाकरे मुंबईत सभा घेणार आहेत.

सध्या सोशल मीडियावर ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा, असे लिहिलेले पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. याला नुकतेच पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकची पार्श्वभूमी असली, तरी हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक असल्यामुळे नेमका कोणावर आघात होणार याच्या चर्चा रंगलेल्या आहेत.

येत्या शनिवारी संध्याकाळी पाच वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. मनसे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसोबत महाघाडीत येण्याच्या चर्चा आहेत. मनसेला राष्ट्रवादीकडून हिरवा कंदील मिळाल्याचे म्हटले जाते. त्यात शुक्रवारी मुंबईत झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ‘हे महागठबंधन आहे, आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले असल्याचे म्हटल्यामुळे काँग्रेसच्या महाआघाडीची दारे मनसेसाठी उघडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

Leave a Comment