मनसेला आघाडीत घेण्यासाठी अजित पवारांची जोरदार बॅटिंग

ajit-pawar
पुणे : अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमिवर राजकीय पक्षांच्या युत्या-आघाड्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. सेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी महाराष्ट्रात महत्त्वाच्या भूमिकेत असले, तरी या निवडणूकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मनसेला आघाडीत घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

त्याचदरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलणी सुरु असल्याचे सांगितले. पण दुसरीकडे, आघाडीत राज ठाकरे यांना घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. या विरोधाचे कारण म्हणजे, उत्तर भारतात काँग्रेसला फटका बसू शकतो. पण अजित पवार यावर बोलताना म्हणाले, ताठर भूमिका काँग्रेसने घेऊ नये. चंद्राबाबू काँग्रेसला चालतात, मग राज ठाकरे का नको?, असा सवाल उपस्थित केला.

राज ठाकरे यांची अजित पवार यांनी याआधीही ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात त्यावेळीही अजित पवारांनी राज ठाकरेंशी चर्चा केली होती. किंबहुना, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले आहेत. पण मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसने सातत्याने विरोध केला आहे. उत्तर भारतात काँग्रेसला फटका बसेल, असा काँग्रेसचा दावा आहे.

पण आघाडीत जाण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप काहीच भूमिका मांडली नाही. किंबहुना, लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसेची रणनीती काय असेल, याबाबताही राज ठाकरे अद्याप जाहीर बोलले नसल्यामुळे राज ठाकरे यांचे या सर्व गोष्टींवरील एकंदरीत मौन आणि त्यात राष्ट्रवादीकडून मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात होणारे प्रयत्न, यातून येत्या काळात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment