यझिदी – इसिसच्या नरकाची साक्षीदार जमात

yazadi
हुकूमशहा सद्दाम हुसेन यांची सत्ता 2004 मध्ये उलथल्यानंतर इराक हा देश सतत अस्वस्थतेच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंसा आणि अस्थिरतेने त्रस्त झालेल्या या इराकमध्ये एक हृद्य सोहळा पार पडला. या जगातील सर्वात भयानक आणि अत्याचारी जीवन जगलेल्या काही व्यक्तींना आपले सामान्य जीवन परत मिळाले.

गेल्या तब्बल पाच वर्षांच्या कैदेनंतर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (दाएश किंवा इसिस) ताब्यात असलेल्या काही यझिदी स्त्रिया आणि मुलांचे आपल्या कुटुंबाशी पुनर्मिलन झाले. यावेळी या यझिदी लोकांच्या भावना उचंबळून आल्या. एकमेकांना घट्ट आलिंगन देऊन त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी अनुभवलेल्या सर्व यातनांची कल्पना त्यांच्या या आवेगातून दिसून येत होती.

सिंजर आणि दोहुक या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर या प्रियजनांची भेट झाली. अर्थात या मीलन सोहळ्यात केवळ 18मुले-मुली सामील झाली होती. ती 10 ते 15 वयोगटातील होती. यातील 11 जण मुले होती. त्यांच्यापैकी अनेकांना लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी अनेकांना शंका आहे. त्यांना घेण्यासाठी मोजकेच पालक आले होते, कारण त्यांच्यापैकी बहुतेक जण अजूनही बेपत्ता आहेत किंवा मारले गेले आहेत. अन्य काही पालकांनी पाश्चात्य देशांमध्ये आश्रय मागितला आहे.

येझिदी समाज हा अनेक पुरातन परंपरा सांभाळणारा असला तरी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व 12व्या शतकापासून सुरू झाले. सुफी परंपरेतील आदि इब्ज मुसाफीर हा येझदींचा देवदूत. परमेश्वराचा या देवदूताशी संवाद झाला व आदि इब्ज मुसाफीर याने तो येझिदींना समजावून सांगितला. सोळाव्या शतकात येझिदींवर ते सैतानाचे पूजक असल्याचा आरोप होऊ लागला. तेंव्हापासून त्यांच्यावर बहिष्कार सुरू झाला. आजवरच्या इतिहासात यझिदींचे तब्बल 74नरसंहार झाले आहेत.

याझिदींची इराकमधील संख्या पाच लाख आहे. जगभर ती तीन लाख आहे. उत्तर इराणमधील मोसुल आणि डोहूक जिल्ह्यात यांच्या वस्ती होत्या. गेली वीस वर्षे त्यांना शहरातून विस्थापित होवून सिंजर डोंगरभागात आश्रय घ्यावा लागला आहे. इराकखेरीज जर्मनी आणि तुर्कस्थानमध्ये त्यांची वस्ती आहे. त्याखेरीज ते जगातील अनेक देशात थोड्या प्रमाणात आहेत.

उत्तर इराकच्या नैनवा प्रांतातील सिंजर शहरात मुख्यतः यझिदी समुदायातील लोक सध्या राहतात. इसिसच्या दहशतवाद्यांनी 2014 मध्ये या प्रदेशात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी यझिदी समुदायाच्या सदस्यांना ताब्यात घेतले होते आणि त्यांना गुलाम केले होते, त्यांच्यावर बलात्कार केले होते. त्यावेळी त्यांनी 10000 पेक्षा अधिक यझिदी महिला व मुलींना कैदी बनविले आणि त्यांना मोसूल व सीरियातील बाजारांमध्ये विकले होते. त्यांपैकी 3100 यझिदी महिला व मुलींचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या महिला व मुलींना इसिसने पळवून नेले होते आणि त्यांना शोधण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. इसिसच्या दृष्टीने यझिदी हे काफीर आहेत त्यामुळे त्यांचा नायनाट करणे हे इसिसचे लक्ष्य आहे.

अमेरिकेचे साहाय्य असलेल्या फौजांनी सीरियात इसिसचा पाडाव केला आहे. त्यानंतर त्यांच्या प्रभावाखालील क्षेत्रातून हजारो नागरिक बाहेर आले आहेत. शनिवारी आलेल्या 3 यझिदी महिला आणि 18 मुले हा त्यांचाच एक भाग होता. इसिसच्या तावडीतील अनेक लहान मुलांचा भुकेने मृत्यू झाला असून 500 पुरुषांची कत्तल करण्यात आली आहे, असा यझिदी कार्यकर्त्यांचा दावा आहे. इसिसच्या मागावर असलेल्या ब्रिटीश सैनिकांना बागुझ येथे किमान 50 महिलांची शिरे सापडली होती. या महिलांना सेक्स स्लेव्ह म्हणून वागविण्यात येत होते.

इसिसच्या दहशतवाद्यांनी यझिदी लोकांना ‘इस्लाम स्वीकार करा अन्यथा शिरच्छेद करू’, अशी धमकी दिली होती. अल्पवयीन मुलांना गुलाम म्हणून आणि मुलींना लैंगिक गुलाम म्हणून इसिसने पळवले होते. अगदी अल्पवयीन मुलांना शस्त्रे चालवायला शिकवून त्यांना इसिसच्या सैन्यात सैनिक म्हणून लढायला भाग पाडले गेले होत. अनेक कुटुंबांना इस्लाम स्वीकारत नसल्याने मारण्यात आले होते.

विशेष म्हणजे येझिदींच्या संस्कृतीचे हिंदू संस्कृतीशी मोठ्या प्रमाणात साम्य आहे. येझिदींच्या अध्यात्मिक परंपरा हिंदूंच्या आणि त्यातही सूर्योपासनेच्या आहेत, असा उल्लेख आहे. त्यांच्या वाङ्मयात अनेक ठिकाणी पुनर्जन्माचा उल्लेख आहे. उत्तर इराकमध्ये ‘मिथ्रइझम’ म्हणून एक परंपरा आहे. त्यातील काही भाग वैदिक संस्कृतीचा असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. म्हणूनच या यझिदी लोकांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात यझिदी लोकांची बाजू मांडण्याची विनंती केली होती. ‘आम्हाला केवळ हिंदू आणि ज्यू लोकांनीच थोडे साहाय्य केले आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे.

इसिसचा खात्मा झाल्यामुळे आज हा समुदाय मोकळा श्वास घेऊ शकत आहे. तरीही इसिसच्या खिलाफत नावाच्या नरकाचे साक्षीदार म्हणून इतिहासात त्यांची नोंद होईल.

Leave a Comment