पदार्थांचे रूप एक, पण नावे मात्र काहीच्या बाहीच !

food
एखाद्या पदार्थाच्या नावावरून हा पदार्थ दिसायला साधारण कसा असेल, किंवा हा पदार्थ बनविताना यामध्ये कोणकोणते साहित्य वापरले गेले असेल याची साधारण कल्पना खवय्ये मंडळी करू शकतात. मात्र पाश्चात्य देशांमध्ये उपलब्ध असलेले काही पदार्थ तुमच्यासमोर आणले गेले आणि या पदार्थांची नावे तुम्हाला सांगण्यात आली, तर मात्र या पदार्थांचा आणि त्यांना दिल्या गेलेल्या नावांचा संबंध नेमका कसा जोडावा असा संभ्रम तुमच्या मनामध्ये नक्कीच निर्माण होईल. उदाहरणच द्यायचे झाले, तर ‘बॉम्बे डक’ नामक पदार्थाचे देता येईल. या पदार्थाचा आणि बदकाचा काहीही संबंध नाही. तसेच ‘ग्रासहॉपर पाय’ या नावाचा पदार्थ ग्रासहॉपर, म्हणजेच नाकतोडा नामक किड्याशी संबंधित नाही. या पदार्थांना अशी विचित्र नावे का मिळाली असावीत हा प्रश्न आपल्या मनामध्ये उभा रहात असतानाच नावावरून पदार्थाची परीक्षा करू नये ही शिकवणही आपल्याला मिळते.
food1
‘डॉल्फिन’ नामक मांसाहारी पदार्थ बार्बेडोस येथील खाद्यपरंपरेमध्ये हमखास आढळणारा पदार्थ असला, तरी या पदार्थांचा आणि डॉल्फिन माशाचा मात्र काही संबंध नाही. हा पदार्थ बनविण्यासाठी ‘माही-माही’ नामक माशाचा वापर केला जात असून, याच माशाला डॉल्फिनफिश या नावानेही ओळखले जाते. म्हणूनच बार्बेडोसमधील हा खास पदार्थ, ‘डॉल्फिन’ या नावाने ओळखला जातो. त्याचप्रमाणे ‘ग्रासहॉपर पाय’ या पदार्थामध्ये ग्रासहॉपर, म्हणजेच नाकतोडा नामक कीटकाचा वापर केला जात नाही. हा पदार्थ केकसारखा दिसणारा असून, हा बनविण्यासाठी कुकीजचा चुरा आणि पुदिन्याचा अर्क असलेल्या क्रीमचा वापर करण्यात येतो. पुदिन्याचा अर्क क्रीममध्ये घातल्याने या क्रीमला हलका हिरवा रंग येतो. हा रंग ग्रासहॉपरच्या रंगाप्रमाणे दिसत असल्याने या पदार्थाला ग्रासहॉपर पाय या नावाने ओळखले जाते. हा पदार्थ १९५०च्या दशकापासून अमेरिकेमध्ये लोकप्रिय आहे.
food2
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये १९४०च्या दशकापासून ‘मंकी ब्रेड’ अतिशय लोकप्रिय आहे. चवीला गोड, मुलायम आणि काहीसा चिकट असणारा हा ब्रेड मैदा, लोणी आणि कॅरामेलच्या मिश्रणाने बनविला जातो. या पदार्थाचा आणि माकडांचा अर्थातच काही संबंध नाही. चीनमधील शांघाईची खासियत असलेल्या ‘लायन्स हेड’चा सिंहाच्या डोक्याशी काहीही संबंध नाही. हा पदार्थ बनविण्यासाठी पोर्क, टोफू, आले आणि सॉय सॉस यांचा वापर केला जात असून हा पदार्थ सर्व्ह करताना मध्ये ‘मीटबॉल’ वाढला जाऊन, त्याच्याभोवती लाल रंगाची ग्रेव्ही घातली जाते. या मीटबॉलच्या भोवताली कोबीच्या पानांची रचना सिंहाच्या आयाळीप्रमाणे दिसत असल्याने या पदार्थाला ‘लायन्स हेड’ म्हटले जाते.
food3
पॅरिस शहरातील बहुतेक सर्वच कॅफेंमध्ये ‘कॅट्स टंग’ हा पदार्थ हटकून मिळतोच. पण हा पदार्थ बनविताना मांजरीच्या जीभेचा वापर केला असावा अशी समजूत मात्र अजिबात करून घेऊ नये. हा पदार्थ म्हणजे वास्तविक पातळ, कुरकुरीत आणि थोडा लांबुळका आकार असलेली मैद्याची बिस्किटे असतात. हा पदार्थ फ्रांसचीच खासियत असून, डच लोक याच पदार्थाला ‘काटे टोंग’ म्हणून ओळखतात.

Leave a Comment