'द हल्क'चा रंग हिरवा का? - Majha Paper

‘द हल्क’चा रंग हिरवा का?

hulk
लहान मुलांना अतिशय प्रिय असणारे त्यांचे आवडते सुपरहिरो नेमके अस्तित्वात आले कसे यामागील किस्से मोठे रोचक असतात यात शंका नाही. पण अनेकदा या सुपरहिरोजचे निर्माण करताना निर्मात्यांच्या मनामध्ये असते एक, पण घडते मात्र दुसरेच आणि मनामध्ये असलेल्या सुपरहिरोच्या रूपाच्या ऐवजी त्या सुपरहीरोचे निराळेच रूप साकारत जाते. असेच काहीसे घडले ‘द हल्क’च्या बाबतीत. जेव्हा ‘द इन्क्रेडिबल हल्क’ या कॉमिकचे प्रिंटींग सुरु झाले, तेव्हा त्यामध्ये कराव्या लागलेल्या काही आवश्यक बदलांमुळे हल्कचा रंग बदलला आणि त्यानंतर आताच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्याच परिचयाचा असलेला हिरवा रंग ‘हल्क’ला प्राप्त झाला.

‘हल्क’ हा सुपरहिरो सर्वप्रथम कॉमिक्समध्ये अवतरला होता. या कॉमिकचे निर्माते स्टॅन ली यांनी सुरुवातीला ‘हल्क’ हा राखाडी रंगाचा बनविला होता. हल्कचे रूप काहीसे भयावह वाटावे यासाठी त्याला राखाडी रंग देण्यात आला होता. पण जेव्हा या कॉमिकच्या छपाईला सुरुवात झाली, तेव्हा हल्कच्या शरीरावर असलेल्या राखाडी रंगाची छटा एकसमान ठेवणे अवघड होत होते. त्यामुळे स्टॅनने हा रंग बदलून हिरवा करण्याचे ठरविले. हिरव्या रंगामध्ये हल्क अवतरल्यानंतर त्याचे हे रूप स्टॅन ली यांना इतके जास्त पसंत पडले, की हल्क राखाडी रंगाचा असावा ही कल्पना रद्द करून त्यांनी हिरव्या रंगाला पसंती दिली, आणि त्याचमुळे या सुपरहिरोला अवतरून साठ वर्षांचा काळ उलटून गेला असला, तरी हा पहिल्याप्रमाणे आजही हिरवाच आहे.

Leave a Comment