
मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला बादली हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या संदर्भात नारायण राणे आज संध्याकाळी बांद्रा पश्चिम येथील रंगशारदा येथे होणाऱ्या ‘मुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात’ घोषणा करणार आहेत.
नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष ‘बादली’ घेऊन निवडणुकीच्या रिंगणात
याबाबत माहिती देताना नारायण राणे म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष संपूर्ण ताकदीसह महाराष्ट्रात लढणार आहे. त्याची तयारी जोरात सुरु झालेली आहे. आम्हाला निवडणूक लढण्यासाठी आज हक्काचे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे, याची अधिकृत घोषणा आम्ही आज करणार आहोत.
मुंबईतील सर्व कोकणी माणसे कोकणवासीयांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. नारायण राणे यांच्यासह माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी देखील मुंबईकर कोकणवासीय मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
