
पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने लसीकरणाच्या जनजागृतीसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली असून त्याची अभिनेत्री करीना कपूर सदिच्छा दूत झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ती लसीकरणाबाबत जनजागृती करणार आहे.
करीना करणार सिरम इन्स्टिट्युटच्या लसीकरण मोहिमेच प्रतिनिधित्व
वर्षभर सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियातर्फे ही मोहिम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाचे महत्त्व आणि त्यांची गरज समाजातील वंचित गटांमध्ये पोहचावी यासाठी करीना कपूर जनजागृती करताना दिसणार आहे. गेल्या काही वर्षभरात पोलिओ आणि देवी यांसारख्या रोगांचे लसीकरणामुळेच उच्चाटन शक्य झाले आहे. असे असले तरीही गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांचे मृत्यू इतर काही आजारांमुळेही झाल्याच्या घटना घडतात. मुले किंवा गर्भवती स्त्रियांचा गोवर, घटसर्प यांसारख्या आजारांमुळे मृत्यू होत असल्यामुळेच सिरम इन्स्टिट्युटने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे.
