सरकारने डिलीट केले युट्युबवरील विंग कमांडरशी संबंधित व्हिडिओ

you-tube
नवी दिल्ली – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने युट्यूबवरुन भारतीय वायूसेनेच्या मिग २१ या लढाऊ विमानाचे वैमानिक अभिनंदन यांच्याशी निगडीत काही व्हिडिओज डिलीट केले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. पाकिस्तानकडून युट्युबवर विंग कमांडर अभिनंदन यांचे अपमानजनक व्हिडिओ अपलोड केल्याची आमच्याकडे तक्रार आली होती. याप्रकरणी आम्ही युट्युबला एक नोटीस पाठवली होती. त्यांनी त्याप्रमाणे अंमलबजावणी करत अभिनंदन यांच्याशी निगडीत ११ व्हिडिओज डिलीट केले असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली.

भारत-पाकिस्तान यांच्यात बुधवारी झालेल्या हवाई चकमकीवेळी एलओसी पार करून मिग विमानाचे वैमानिक अभिनंदन पाकिस्तानात पोहोचल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना अटक केली होती. त्यानंतर एक व्हिडिओ पाकिस्तानी लष्कराकडून जारी करण्यात आला होते. अभिनंदन यांना त्यांच्याशी संबंधित प्रश्न यामध्ये विचारण्यात येते होते आणि अभिनंदन हे अत्यंत खंबीरपणे त्यांना उत्तरे देताना दिसले होते.

लोकांनी हा व्हिडिओ आल्यानंतर तो सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अभिनंदन यांच्याशी निगडीत अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आणि लोकांनी अभिनंदन या नावाने अनेक हॅशटॅगचा वापरही सुरु केला. त्याचबरोबर युट्युबवरही हे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्यामुळे युट्युबला माहिती प्रसारण मंत्रालयाने सूचना करत हे व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. हे व्हिडिओ डिलीट करण्यास गृहमंत्रालयानेही सांगितले होते.

Leave a Comment