शिवबंधन तोडून, घड्याळ बांधणार डॉ. अमोल कोल्हे ?

amol-kolhe
मुंबई – लवकरच शिवसेनेचे शिवबंधन तोडून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा असून अमोल कोल्हे यांचा आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. जर असे काही घडले तर लोकसभा निवडणुकीच्या शिवसेनेला हा जबर हादरा असणार आहे.

दरम्यान अमोल कोल्हे हे आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमोल कोल्हे यांच्यासह दोन माजी आमदारांचाही शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतो आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे पक्षप्रवेश करतील अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अमोल कोल्हे यांनी भेट घेतली होती. ही भेट बारामती येथील गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानीच झाली होती. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यावेळी त्यांच्यासोबत होते. या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले होते.

Leave a Comment