ही तथ्ये तुमच्या परिचयाची आहेत का?

fact
सध्याच्या आधुनिक आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत युगामध्ये जगातील कोणत्याही गोष्टीच्या बाबतीतली माहिती मिळविणे सोपे झाले आहे. इंटरनेट सारख्या प्रभावी माध्यमाच्या द्वारे सातत्याने काही तरी नवीन आपल्याला कळत असते. यांपैकी अनेक तथ्ये जाणून घेतल्यानंतर प्रथमदर्शनी यावर विश्वास ठेवणे अंमळ कठीणच असते. पण या पैकी प्रत्येक तथ्याला शास्त्रीय आधार दिला गेला असल्याने यावर विश्वास ठेवणे प्राप्तच असते. अशीच काही अविश्वसनीय भासणारी परंतु वैज्ञानिक आधार असणारी तथ्ये जाणून घेऊ या.
fact1
‘आईकीया’ या स्वीडिश फर्निशिंग कंपनीचा कॅटलॉग असणारे पुस्तक जगामध्ये सर्वाधिक छापले जाणारे पुस्तक असून, याचा खप बायबलइतका किंवा कदाचित त्याही पेक्षा जास्त आहे. २०१६-१७ या एका वर्षामध्ये ‘आईकीया’च्या कॅटलॉगच्या तब्बल २०३ मिलियन कॉपीज जगभरामध्ये खपल्या होत्या. ‘आईकीया’ ही सुप्रसिद्ध कंपनी आता भारतामध्येही आली असून, या कंपनीचे पहिले स्टोअर हैदराबाद मध्ये सुरु झाले आहे. लवकरच या कंपनीची अधिक स्टोअर्स मुंबई सह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सुरु होत आहेत. ‘आईकीया’ या कंपनीने फर्निशिंगज् डिझाईन करताना तब्बल ७२ देशांमधील लोकांचे राहणीमान, जीवनशैली आणि आवडीनिवडी विचारात घेऊन आपली प्रोडक्ट्स बाजारामध्ये आणल्याने ही प्रोडक्ट्स जगभरामध्ये अतिशय लोकप्रिय ठरली आहेत.
fact2
सिम्पथेटिक ऑप्थॅल्मिया हा डोळ्याचा अतिशय दुर्मिळ पण गंभीर विकार आहे. एका डोळ्याच्या ‘युविया’ला जर काही कारणाने इजा झाली तर या डोळ्याची दृष्टी कमी होऊ लागते. यामध्ये आश्चर्यकारक गोष्ट अशी, की इजा झालेल्या डोळ्याची दृष्टी कमी होत असतानाच दुसऱ्या डोळ्याची दृष्टी, एरव्ही उत्तम असूनही, त्या डोळ्याच्या बाबतीत कोणतीही समस्या न उद्भवता देखील आपोपाप कमी होत जाते. डोळ्यांची ही समस्या अतिशय दुर्मिळ असून, डोळ्यांना इजा झालेल्या केवळ ०.५ टक्के व्यक्तींच्या बाबतीत ही समस्या उद्भवू शकते.
fact3
भारतातील कोलकाता शहरामधील आचार्य जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डनमध्ये असलेला वडाचा वृक्ष या उद्यानाची खासियत समजला जातो. २५५ वर्षांपेक्षाही जुना असलेला हा विस्तीर्ण वृक्ष १४,५०० स्क्वेअर मीटर्सच्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला असून, जगातील सर्वात मोठ्या वृक्षांपैकी हा एक समजला जातो. एखाद्या मोठ्या शॉपिंग सेंटर पेक्षाही मोठ्या असलेल्या वृक्षाचा उल्लेख गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ही केला गेला आहे.

Leave a Comment