अशी आहे हिमाचली ‘धाम’ खाद्यपरंपरा

food
हिमाचल प्रदेशची खास ‘धाम’ ही खाद्यसंस्कृती सुमारे तेराशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. हिमाचल प्रदेशच्या एका बाजूला काश्मीर आणि दुसऱ्या बाजूला पंजाब ही राज्ये असल्याने या राज्यांच्या खाद्यपरंपरेचा प्रभाव हिमाचली पदार्थांवर दिसून येतो. साधारण तेराशे वर्षांपूर्वी तत्कालीन हिमाचली राजे जयस्तंभ यांना काश्मिरी ‘वाझ्वान’ ( खास काश्मिरी पदार्थ) इतके जास्त आवडले, की त्यांनी आपल्या खानसाम्यांना असेच पदार्थ, पण पूर्ण शाकाहारी रूपात बनविण्यास सांगितले. अशा रीतीने खास हिमाचली ‘धाम’ खाद्यपरंपरेचा जन्म झाला.
food1
सुरुवातीच्या काळामध्ये ‘धाम’च्या अंतर्गत बनविले जाणारे पदार्थ केवळ मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मिळत असत. त्यामुळे हे पदार्थ बनविणारे खानसामे हे केवळ ब्राह्मण समाजातील असत. या खानसाम्यांना ‘बोटी’ म्हटले जात असे. पण आताच्या काळामध्ये ‘धाम’ अतिशय लोकप्रिय झाले असून, विवाहसोहळ्यासाठी किंवा तत्सम मोठ्या पारंपारिक किंवा धार्मिक प्रसंगांच्या निमित्ताने ‘धाम’ पद्धतीचे पदार्थ आवर्जून बनविले जात असतात. ‘धाम’मधील सर्व पदार्थ हे ‘सात्विक’ असून यांमध्ये कांदा, आले, किंवा लसूण वापरले जात नाहीत. आजच्या काळामध्येही हे पदार्थ ‘बोटी’ समाजातील खानसामेच बनवितात.
food2
‘धाम’ खाद्यपरंपरेचे आणखी एक वैशिष्ट्य असे, की या पदार्थांमध्ये कोणत्याही भाज्यांचा वापर केला जात नाही. ‘धाम’ पद्धतीचे भोजन बनविताना यामध्ये केवळ डाळी, कडधान्ये, दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर केला जातो. हे भोजन ज्या भांड्यांमध्ये बनविले जाते, त्या भांड्यांना ‘चारोटी’ म्हटले जात असून, एखाद्या मोठ्या हंड्याप्रमाणे दिसणारी ही तांब्याची भांडी असतात. या भांड्यांचा आकार विशिष्ट पद्धतीचा असून, ही भांडी अतिशय जाड असल्याने यामध्ये अन्न खूप वेळ गरम राहू शकते. ‘धाम’ भोजन चुलीवर शिजविले जात असून, ज्या ठिकाणी हे भोजन बनविले जाते त्या स्वयंपाकघराला ‘रसिअलू’ म्हटले जाते. ‘धाम’ भोजन हे खास भांड्यांमध्ये आणि खास पद्धतीने बनविले जात असल्याने याची चवही नेहमीच्या पदार्थांच्या मानाने वेगळी असते.
food3
हिमाचल प्रदेशच्या प्रत्येक भागामध्ये ‘धाम’ काहीसे निरनिराळ्या पद्धतीने बनविले जात असले, तरी या सर्वांमध्ये ‘कांगडी धाम’ सर्वाधिक लोकप्रिय आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे भात, मुगाचे वरण, याचबरोबर सुमारे वीस निरनिराळ्या मसाल्यांचा वापर करून दह्यामध्ये शिजविलेले राजमा किंवा छोले हा मुख्य पदार्थ असतो. तसेच ‘माश की दाल’ हा पदार्थ ही ‘धाम’ खाद्यपद्धतीची खासियत आहे. अख्खे उडीद, मूग आणि मसूर या डाळी एकत्र करून हा पदार्थ बनविला जातो. या पदार्थांच्या ग्रेव्हीसाठी दुध, खवा, दही इत्यादी पदार्थांचा सढळ हस्ते वापर केला जातो. ‘धाम’ भोजनाचा शेवट ‘मीठा भात’ किंवा बुंदीने बनविलेल्या ‘मीठडी’ ने होतो. या पदार्थांमध्ये कोणत्याही कृत्रिम खाण्याच्या रंगांचा वापर केला जात नाही. पारंपारिक धाम भोजन पत्रावळीवर वाढले जात असून, जमिनीवर बसून हे भोजन ग्रहण करण्याची पद्धत रूढ आहे.

Leave a Comment