‘आईस स्विमिंग’ आहे रशियातील सध्याचे नवे फॅड

swimming
रशियातील मॉस्कोची निवासी व्हिक्टोरिया त्सुरानोव्हा, दूरवर पसलेली बर्फाची चादर कोरून त्यामध्ये बनविल्या गेलेल्या मोठ्या, अतिशय थंड पाण्याच्या तलावामध्ये उडी मारते, त्या पाण्यामध्ये काही मिनिटे पोहते आणि पाण्यातून बाहेर आल्यानंतर काढला गेलेला आपला एक छानसा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करते. केवळ व्हिक्टोरियाच नाही, तर तिच्याप्रमाणे अनेक तरुण मंडळी अशा प्रकारे आईस स्विमिंग करीत असून, या फॅडचे लोण रशियामध्ये झपाट्याने पसरत चालले आहे. आईस स्विमिंग करणाऱ्या या मंडळींना ‘न्यू एज वॉलरस’ म्हटले जात असून, ज्याप्रमाणे वॉलरस हा प्राणी बर्फाच्या खाली असलेल्या थंड पाण्यामध्ये पोहू शकतो, त्याचप्रमाणे ही मंडळी सहजगत्या या पाण्यामध्ये पोहू शकत असल्याने त्यांना ही उपमा देण्यात आली आहे.
swimming1
आईस स्विमिंग करण्याने आरोग्याला मात्र मोठा फायदा होत असल्याचे या मंडळींचे म्हणणे आहे. त्यांच्या मते शक्य असेल तेव्हा बर्फाच्या खाली असलेल्या थंड पाण्यामध्ये पोहोल्याने सर्दी पडसे होत नाही, आणि झालेले असले तरी त्वरित बरे होते. तसेच आईस स्विमिंग मुळे ‘सेल्युलाईट’ म्हणजेच त्वचेच्या खाली असलेली चरबी देखील वेगाने घटते. इतक्या थंड पाण्यामध्ये काही मिनिटे पोहोल्याने शरीरामध्ये एक निराळीच चेतना निर्माण होत असल्याचे या मंडळींचे म्हणणे आहे.
swimming2
या सर्व उत्साही मंडळींनी एकत्र येऊन ‘वॉलरसेस ऑफ द कॅपिटल’ नामक एका क्लबची स्थापना केली असून, त्याद्वारे आईस स्विमिंगचा एक नवा ट्रेंड प्रस्थापित केला आहे. सध्या मॉस्को येथील तापमान -२ अंशांच्याही खाली असले, तरी या मंडळींचा आईस स्विमिंगचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही. व्हिक्टोरिया त्सुरानोव्हा स्वतः फिटनेस ब्लॉगर असून, तिचे इन्स्टाग्रामवर १०३,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आईस स्विमिंग साधारणपणे शून्य ते -४ या तापमानामध्ये केले जात असून, त्यामुळे शरीराचे व त्वचेचे आरोग्य उत्तम राहते. मात्र ज्यांना दम्याशी किंवा हृदयरोगाशी निगडित समस्या असतील त्यांनी आईसस्विमिंग पासून लांब राहणे इष्ट असल्याचे व्हिक्टोरिया म्हणते.

Leave a Comment