यंदाच्या उन्हाळ्यात चला मार्चुला सहलीला

machula
उन्हाळा सुरु झाला कि कुठे सहल काढायची याच्या योजना बरेचजण आखू लागले असतील. नैसर्गिक सौंदर्य, वन्य प्राण्यांचे दर्शन, सुंदर पक्षी आणि खळाळत्या नद्या तसेच मनोहर हिमशिखरे याचे दर्शन निवांतपणे घ्यायचे असेल तर उत्तराखंड राज्यातील जिम कार्बेट उद्यानाचा भाग असलेल्या मार्चुला येथे नक्की जा. हे ठिकाण पर्यटकांना खूप परिचयाचे नाही त्यामुळे येथे गर्दी कमी आहे. काही शो आणि फिल्म शुटींग मुळे हे ठिकाण प्रसिद्धीस येऊ लागले आहे.

birds
या ठिकाणी पक्ष्यांच्या ८०० विविध प्रजाती पहावयास मिळतात. हिमालयाच्या उत्तुंग पहाडांनी घेरलेले, खळाळत्या नद्यांचे, आसपास अनेक प्रेक्षणीय ठिकाणे असलेले हे ठिकाण सहलीसाठी सर्वार्थाने योग्य आहे. स्वातंत्र्यानंतर येथील जिम कार्बेट उद्यानाचे नामकरण रामगंगा राष्ट्रीय पार्क असे केले गेले आहे. या जंगलात वाघ, बिबटे, हत्ती असे अनेक वन्य प्राणी पाहायला मिळतात. रामगंगा नदीकाठी मोठ्या मगरी किनार्यावर आलेल्या पाहता येतात.

maata
येथे जवळच असलेले गर्जीया देवी मंदिर पहाडावर असून तेथे जाण्यासाठी ८० पायऱ्या चढाव्या लागतात. कोसा नदी काठी असलेल्या या स्थानाला भेट देण्यासाठी देशभरातून भाविक येतात. कार्तिक पौर्णिमेला येथे मोठा मेळा भरतो. या मंदिरात शेकडो घंटा आहेत.

croco
येथे वाइल्ड लाईफ म्युझियम बनविले गेले असून तेथे सर्व वन्य प्राणी एकत्र दर्शन देतात कारण ते काचेत ठेवले गेले आहेत. ढिकाला हे येथील मुख केंद्र असून येथे हत्ती राईड करता येते. एकीकडे जंगल आणि दुसरीकडे नदी अश्या ठिकाणी हे केंद्र आहे. येथे रानमांजरे, पाण्यात राहणारे पक्षी, मासे पाहता येतात. जीप राईड, हत्ती राईड, बर्ड सफारी अश्या माध्यमातून हे जंगल पाहता येते. येथे राहण्यासाठी रिसोर्ट, हॉटेल्स, गेस्ट हाउस याची चांगली सुविधा आहे.