युद्धाच्या तयारीला लागले पाकिस्तान

pakistan
नवी दिल्ली – जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारत कधीही वचपा घेऊ शकतो याच भीतीपोटी पाकिस्तानने युद्धाची पूर्वतयारी सुरु केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने भारताच्या कोणत्याही दबावाला पडू नका असे सांगितल्यानंतरच युद्धाची तयारी पाकिस्तानने सुरु केल्याचे दिसत आहे.

पाकिस्तान युद्धाची तयारी करत असल्याच्या वृत्ताला दोन कागदपत्रांच्या आधारे दुजोरा मिळत आहे. यामधील एक बलुचिस्तान येथील पाकिस्तान लष्कर तळावरील आहे. यासोबतच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाला एक नोटीस पाठवण्यात आली आहे. पाकिस्तान भारताशी युद्धाची तयारी करत असल्याचे या नोटीसवरुन स्पष्ट होत आहे.

२० जानेवारी रोजी जिलानी रुग्णालयाला क्वेट्टा कॅन्टोनमेंट स्थित पाकिस्तानी लष्कराच्या हेडक्वार्टर्स क्वेट्टा लॉजिलस्टिक्स एरियाकडून एक पत्र पाठवण्यात आले आहे. भारताशी युद्ध होण्याची शक्यता या पत्रात लक्षात घेत त्यानुसार वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.

क्वेट्टा लॉजिस्टिक परिसरात सिंध आणि पंजाबमधील सिव्हिल किंवा लष्कर रुग्णालयात पूर्व फ्रंटवर आणीबाणी युद्ध परिस्थितीत जखमी जवानांना आणले जाऊ शकते. या जवानांना प्राथमिक उपचारानंतर बलुचिस्तान येथील सिव्हिल रुग्णालयात शिफ्ट करण्याची योजना असल्याचे HQLA चे फोर्स कमांडर एशिया नाज यांनी जिलानी रुग्णालयाच्या अब्दुल मलिक यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे.

यापत्रात असेही म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत लॉजिस्टिक्स परिसरात मिळावी यासाठी योजना आखण्यात आली असून यामध्ये राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णायलांचा समावेश आहे. लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जवानांसाठी सिव्हिल रुग्णालयांमध्ये २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Comment