पुन्हा एकदा नापाक कृत्य करण्याच्या तयारीत जैश-ए-मोहम्मद

jaish-e-mahommad
नवी दिल्ली – जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात केलेल्या नापाक कृत्यानंतर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुन्हा एकदा भयानक नापाक कृत्य करण्याची योजना आखली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान संभाषण झाल्याच्या आधारावरुनच दिला आहे.

याबाबत गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाला अजून मोठे नुकसान पोहोचवण्यासाठी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आणखी एका आत्मघाती हल्ल्याची योजना आखली आहे. काश्मीरच्या बाहेर हा हल्ला केला जाऊ शकतो असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवला आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तयारीचा व्हिडीओ जैश-ए-मोहम्मद जारी करणार आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार अली अहमद दारवर या व्हिडीओत प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. स्फोटकांनी भरलेली आपली व्हॅन 20 वर्षीय अली अहमद दार यानेच सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यात नेऊन धडक दिली होती. ४० जवान ज्यामध्ये शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या व्हिडीओचा आधार घेत काश्मीरमधील तरुणांना संघटनेत सामील करुन घेत आत्मघाती हल्ल्यांसाठी वापर करण्याची शक्यता आहे.