इंडोनेशिया पोलिसांकरवी गुन्ह्याचा कबुलीजबाब मिळविण्यासाठी केला गेला सापाचा वापर !

snake
पोलीस गुन्हेगाराकडून त्याचा गुन्हा कबुल करवून घेण्यासाठी अनेक तऱ्हांचा अवलंब करीत असतात. अनेकदा गुन्ह्याचा कबुलीजबाब मिळविण्यासाठी पोलिसांना कैक हातखंडे वापरावे लागतात. मात्र इंडोनेशियामध्ये मोबाईल फोन चोरल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या एका इसमाकडून गुन्ह्याची कबुली मिळविण्याकरिता पोलिसांनी वापरलेली चौकशीची पद्धत मात्र फारच भयावह होती. या संपूर्ण प्रकारचे रेकॉर्डिंग असणारा एक व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, इंडोनेशियन पोलिसांनी गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी नेमके काय केले हे या व्हिडियोमध्ये दिसून आले आहे.
snake1
इंडोनेशियन पोलिसांनी मोबाईल फोन चोरल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या इसमाकडून गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी चक्क एक लांबलचक जिवंत साप या इसमाच्या गळ्यामध्ये अडकवून दिला असल्याचे या व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा धक्कादायक प्रकार इंडोनेशियाच्या पापुआ भागामध्ये घडला असून, या इसमाच्या हातांमध्ये बेड्या असल्याने तो स्वतःचा बचाव न करण्याच्या परिस्थतीमध्ये असल्याचे ही दिसत आहे. हा इसम भीतीने किंचाळत असून, त्याची चौकशी करणारे पोलीस अधिकारी मजेत हसत असल्याचे आवाजही या व्हिडियोमध्ये कानी पडत आहेत.
snake2
हा व्हिडियो इंडोनेशियातील पापुआ प्रांतातील (मानवाधिकार) ह्युमन राईट्स वकील व्हेरोनिका कोमान यांनी सोशल मिडियावर प्रसिद्ध केला असून, पोलिसांनी गुन्हाच्या कबुलीजबाबासाठी वापरलेल्या या अमानुष पद्धतीवर नेटीझन्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. गुन्ह्याची चौकशी करण्याची ही पद्धत संपूर्णपणे माणुसकीला सोडून असल्याचे म्हणत नेटीझन्सनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनाचा निषेध आपल्या प्रतिक्रियांच्या द्वारे व्यक्त केला आहे. या कृत्याने पोलिसांनी केवळ कायद्याचे नाही तर मानवाधिकारांचे उल्लंघन देखील केले असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

हा व्हिडियो आणि त्यावरील संतप्त प्रतिकियांना वेगाने प्रसिद्धी मिळाल्यानंतर पोलीस खात्याच्या वतीने घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करणारा माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. गुन्हेगाराची चौकशी करण्याची ही पद्धत कायद्याला सोडून असून असा प्रकार पुन्हा घडणार नाही असे आश्वासन पोलीस खात्यातर्फे या माफीनाम्यामध्ये देण्यात आले आहे.

Leave a Comment