मोदींच्या बायोपिक मधील अमित शहांच्या रोलसाठी नेटिझन्सची ‘कल्लूमामा’ला पसंती

amit-shah
बॉलीवूडमध्ये सध्याच्या बायोपिकचे वारे वाहत आहेत. त्यात आता राजकीय नेत्यांचे देखील बायोपिक बनत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बायोपिकनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित बायोपिक तुमच्या भेटीला येणार आहे हे तर तुम्हाला माहितच आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉय हा मोदींची भूमिका साकारणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्याचे मोदींच्या लुकमधील फोटो देखील प्रसिद्ध झाले होते.

आता या चित्रपटात नरेंद्र मोदींची जवळची व्यक्ती असलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भूमिका कोण साकारणार यावरुन पडदा हटविण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता मनोज जोशी हे अमित शहा यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरून दिली आहे. पण त्यांचा हा निर्णय नेटिझन्सच्या पथ्यावर पडला नाही आणि त्यांनी शहांच्या भूमिकेसाठी अभिनेते सौरभ शुक्ला हे योग्य असल्याचे म्हटले आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी अमित शहांच्या भूमिकेसाठी मनोज जोशींऐवजी सौरभ शुक्ला यांच्या नावाचा विचार करायला हवा होता असे नेटकरी म्हणत आहेत. यासंबंधीचे नेटिझन्सच्या शहा आणि सौरभ शुक्ला यांच्यातील साधर्म्य दाखवून देणाऱ्या ट्विट्सनी धमाल उडवून दिली आहे.

या चित्रपटात नरेंद्र मोदींचा एका गरीब घरातील मुलापासून पंतप्रधान बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार हे करत आहेत. विवेक ओबेरॉय, मनोज जोशींशिवाय बोमन इराणी, दर्शन कुमार आणि झरीना वहाब या अभिनेत्यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Leave a Comment