पापुआ न्यू गिनीजवळ समुद्रात सापडलेले अवशेष, अमेलिया एरहार्टच्या विमानाचे असल्याचा संशोधकांचा कयास

Earhart-Plane

सुप्रसिद्ध महिला वैमानिक अमेलिया एरहार्टने १९३७ साली विमानातून संपूर्ण जगाची प्रदक्षिणा करून येण्याची अतिशय धाडसी योजना आखली होती. या योजनेला अनेकांनी विरोध दर्शविला खरा, पण अमेलिया अतिशय महत्वाकांक्षी स्त्री असल्याने ही योजना पूर्ण करायचीच हा निश्चय तिने केला. जगभ्रमंतीला निघालेले अमेलियाचे विमान पापुआ न्यू गिनी जवळ अचानक गायब झाले. त्यानंतर या विमानाचे, आणि त्यामधून जग प्रदक्षिणा करावयास निघालेल्या अमेलिया एरहार्ट व तिच्या सहकाऱ्याचे पुढे काय झाले हे आजवर न उकललेले गूढ होऊन बसले. अमेलियाच्या विमानाचे नेमके काय झाले असावे याबद्दल अनेक अंदाज गेल्या अनेक वर्षांमध्ये व्यक्त केले जात होते. यामध्ये समुद्रामध्ये अमेलियाचे विमान कोसळले असण्याच्या शक्यतेपासून जपानी सैन्याने अमेलियाचे विमान नष्ट केले असण्याच्या शक्यतेपर्यंत अनेक अंदाज मांडले जात आले आहेत.

Earhart-Plane2

मात्र अलीकडच्या काळामध्ये संशोधकांच्या दलाने पापुआ न्यू गिनीमधील बुका बेटाजवळ समुद्रामध्ये विमानाचे अवशेष शोधून काढले असून, हे अवशेष अमेलियाच्या विमानाचे असावेत असा कयास व्यक्त केला आहे. ‘प्रोजेक्ट ब्ल्यू एन्जेल’ नामक प्रकल्पात कार्यरत असलेल्या संशोधकांना हे अवशेष सर्वप्रथम २०१८ साली, ऑगस्ट महिन्यामध्ये आढळले. या विमानाचे अवशेष अमेलियाने जग प्रदक्षिणेसाठी वापरलेल्या विमानाशी पुष्कळ मिळते जुळते असून, यामधील एक ग्लास डिस्क अमेलियाच्या विमानामध्ये असलेल्या ‘लाईट लेन्स’शी तंतोतंत जुळणारी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

Earhart-Plane1

अमेलिया एरहार्ट आणि तिचा नॅव्हीगेटर सहकारी फ्रेड नूनन यांना घेऊन निघालेले विमान २ जुलै १९३७ साली पापुआ न्यू गिनीजवळ गायब झाले. त्यावेळी हे विमान प्रशांत महासागरातील हाऊलंड बेटाकडे येण्यास निघाले होते. २० मे १९३७ साली अमेलियने विमानातून जगप्रदक्षिणा करण्याचे आपले मनोगत जाहीर केले होते. त्यानंतर दक्षिण अमेरिका, दक्षिण-पूर्व आशियाचा वीस हजार मैलांचा प्रवास पूर्ण करीत अमेलिया २९ जून १९३७ रोजी पापुआ न्यू गिनी येथल ‘ले’ या ठिकाणी पोहोचली होती. त्यानंतर अमेलियाच्या जगभ्रमंतीच्या शेवटच्या सात हजार मैलांच्या टप्प्याला सुरुवात होणार होती. २ जुलै रोजी प्रवासाच्या अंतिम टप्प्यासाठी निघालेल्या अमेलिया आणि फ्रेड यांनी वाटेत हाऊलंड बेटावर उतरण्याचा निर्णय घेतला. अमेलियाच्या विमानाला दिशा निश्चित करण्याच्या कामी सहायता म्हणून ‘USCGC Itasca’ नामक एक जहाज येथे तैनात करण्यात आले.

Earhart-Plane3

२ जुलै रोज सकाळी ७:४२ वाजता अमेलिया कडून संदेश आला. आपल्याला जहाज दिसत नसून, आपण एक हजार फुटांच्या उंचीवर आहोत, व विमानातील इंधन कमी असल्याचा हा संदेश अमेलियाकडून आला होता. तसेच जहाजाशी रेडियो संपर्क होऊ शकत नसल्याचे ही या संदेशामध्ये म्हटले होते. त्यानंतर आपण उत्तरेकडे चाललो असल्याचा संदेश अमेलियाने पाठविला होता, तो शेवटचा. त्यानंतर अमेलियाचे विमान गायब झाले, ते कायमचेच.

आता संशोधकांना सापडलेले विमानाचे अवशेष अमेलियाच्या विमानाचे असावेत हे सिद्ध करणारा आणखी एक पुरावा असा, की अमेलियाने आपल्या विमानाच्या डिझाईनमध्ये काही खास बदल, म्हणजेच ‘मॉडिफिकेशन्स’ करवून घेतली होती. सापडलेल्या विमानाच्या अवशेषांमध्येही ही मॉडिफिकेशन्स आढळली आहेत. त्यावरून हे विमान अमेलियाचे ‘इलेक्ट्रा’ विमान असावे असा प्राथमिक अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. या अंदाजाचे खात्रीमध्ये रूपांतर होण्यासाठी अधिक संशोधन सुरु असल्याचे समजते.

Leave a Comment