जागतिक एपिलेप्सी दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया या आजाराविषयी काही

Epilepsy
अकरा फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक एपिलेप्सी दिवस’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी या आजराविषयी लोकांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविण्यासाठी, या आजाराच्या विषयी लोकांच्या मनामधे असलेले अनेकविध गैरसमज दूर करण्यासाठी आणि या आजाराच्या उपचारपद्धती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक चर्चासत्रांचे, इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. भारतामध्ये या आजाराने सुमारे सव्वा कोटी व्यक्तींना ग्रासलेले आहे. हा विकार भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असला, तरी या विकाराविषयी लोकांच्या मनामध्ये असलेले अनेक गैरसमज, या आजाराबद्दलचे अपुरे ज्ञान आणि भीती यापोटी अनेकदा रुग्णाला योग्य उपचार मिळू शकत नाहीत. उपचारांच्या अभावी अनेकदा रुग्ण प्राणांनाही मुकण्याची शक्यता असते.
Epilepsy1
एपिलेप्सीचा विकार हा मेंदूशी निगडीत असून, या आजारामध्ये रुग्णाला वारंवार फिट्स येतात. मेंदूशी निगडीत नर्व्हस सेल्स इलेक्ट्रिक करंट्स अतिशय वेगाने पाठवू लागल्याने अशा प्रकारच्या फिट्स येतात. अनेकदा डोक्याला खूप मार लागल्याने किंवा मेंदूमध्ये झालेल्या इन्फेक्शनमुळे ही फिट्स येऊ शकतात. रुग्णाला आलेली फिट ही काही मिनिटांच्या अवधीपार्यंत राहते. पण त्या वेळी रुग्णाला योग्य मदत मिळाली नाही, तर कठीण प्रसंग ओढवू शकतो. फिट आलेली असताना रुग्णाचा स्वतःच्या हालचालींवर ताबा राहत नसून, त्यामुळे रुग्णाला इजा होण्याचाही संभव असतो. अनेक रुग्ण एपिलेप्सीवर उपचार घेणे सुरु करेपर्यंत उशीर झालेला असतो, तर अनेक रुग्ण उपचार अर्धवट सोडतानाही पहावयास मिळतात.
Epilepsy2
अनेकदा या विकाराबद्दल लोकांना फारशी माहिती नसते, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या आजाराविषयी भीती आणि गैरसमज आढळून येतात. अनेकदा या आजाराच्या ऐवजी या आजाराबद्दल असलेल्या भीती आणि गैरसमजांच्या पायी रुग्ण प्राणांना मुकल्याच्या अनेक केसेस पहावयास मिळतात. अनेकदा या रुग्णांना वाळीतही टाकले जाते. म्हणूनच या आजाराविषयी लोकांना माहिती करून देणे आवश्यक ठरते. त्यामुळे घरामध्ये कोणाला हा आजार असल्यास त्याचे योग्य उपचार करविण्याबद्दल जागरूकता निर्माण होते, तर कामाच्या ठिकाणी एखाद्याला फिट आलीच तर घाबरून न जाता योग्य उपचार देणे शक्य होते.
Epilepsy3
एपिलेप्सीच्या रुग्णांना फिट अचानक येऊ शकते. जर रुग्णाला कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव असेल, तर फिट्स येण्याचे प्रमाण जास्त असू शकते. एपिलेप्सीच्या रुग्णाच्या परिवाराला, जवळच्या मित्र मंडळींना आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांनाही या आजाराबाबत पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. तसेच रुग्णाला फिट आली, तर त्वरेने वैद्यकीय मदत मागवावी. रुग्णाच्या तोंडामध्ये चमचा किंवा तत्सम कठीण वस्तू घालणे असे प्रकार कटाक्षाने टाळावेत. रुग्णाला जमिनीवर झोपवून त्याच्या हालचाली नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. जर रुग्णाचा जबडा घट्ट बंद असला, तर तो जबदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करू नये. रुग्णाच्या जवळपासच्या अवजड वस्तूही हटवाव्यात. आजकाल उपलब्ध असलेल्या औषधांनी फिट्सचे प्रमाण पुष्कळ मर्यादित झाले असले, तरी हे उपचार नेमाने घेणे आवश्यक आहे. जर औषधोपचार नियमित केले जात असले, तर रुग्णाचा विकार बळावून त्यासाठी शस्त्रक्रिया किंवा तत्सम इतर उपचार करण्याची वेळ येत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment